दुबई : श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणे आवडते. त्याचवेळी ऋषभ पंत याला २०२१ च्या सत्रात कर्णधार नेमण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचा सन्मान करीत असल्याचे श्रेयसने म्हटले आहे. २०२०च्या सत्रात श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती, मात्र यंदा पहिल्या टप्प्यात खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस खेळू शकला नाही. ऋषभ संघाचे नेतृत्व करीत आहे.
दुसरा टप्पा सुरू होताच २६ वर्षांच्या श्रेयसने संघात खेळाडू म्हणूनच पुनरागमन केले. सनरायजर्स विरुद्धच्या विजयात नाबाद ४७ धावांचे योगदान दिल्यानंतर अय्यर म्हणाला,‘मी संघाचे धोरण समजू शकतो, मला कुठलीही अडचण नाही. माझ्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले त्यावेळी मानसिकदृष्ट्या मी वेगळ्या स्थितीत होतो. निर्णय क्षमता आणि सहनशिलतेचा स्तर चांगला होता. मागच्या दोन वर्षांत याचा लाभदेखील झाला. हा फ्रॅन्चायजीचा निर्णय असून जो निर्णय झाला त्याचा मी पूर्ण सन्मान करतो.’
‘ऋषभ यंदा चांगले नेतृत्व करीत आहे. त्यामुळेच व्यवस्थापनाने त्याला सत्रअखेरपर्यंत कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मी आदर करतो. मला दडपणात खेळण्यात नेहमी आवडते. अशावेळी धावा काढताना आपला खेळ बहरतो.