तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात या सामन्यासाठी चार बदल केल्यानंतर गोलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. आफ्रिकेचे तीन गडी स्वस्तात बाद झाले. पण तिसऱ्या विकेटनंतर आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. क्विंटन डी कॉक आणि वॅन डर डुसेन यांनी शतकी भागीदारी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. या सामन्यात श्रेयस अय्यरने घेतलेला झेल चांगलाच चर्चेत होता.
भारताने आफ्रिकेचे ३ बळी टिपल्यानंतर डी कॉक आणि वॅन डर डुसेन या जोडीने दमदार फटकेबाजी केली. डी कॉकने सर्व गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. डी कॉकने १२४ धावांची दमदार खेळी केली. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात युजवेंद्र चहलला गोलंगाजी देण्यात आली. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात डुसेनने मोठा फटका खेळला. चेंडू सीमारेषा पार करणार असं वाटत असतानाच वाऱ्याच्या वेगाने श्रेयस अय्यरने झेप घेतली आणि जमिनिच्या अगदी जवळ असताना चेंडू झेलला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, क्विंटन डी कॉक आणि डुसेन दोघेही फटकेबाजी करत होते. त्यामुळे भारताला ती भागीदारी तोडायची होती. अशा परिस्थितीत कर्णधार केएल राहुलने वेगवेगळे पर्याय चाचपडून पाहायला सुरूवात केले. त्याच वेळी अचानक श्रेयस अय्यरही गोलंदाजी करताना दिसला. विशेष म्हणजे, उजव्या हाताच्या वॅन डर डुसेनसमोर त्याने लेग स्पिन गोलंदाजी केली. तर डावखुऱ्या डी कॉकला त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर श्रेयस अय्यरची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती.