नवी दिल्ली : वडिलांना गमावल्यानंतरही संघासोबत थांबण्याचा निर्णय घेणारा तसेच स्थानिक प्रेक्षकांच्या वर्णद्वेषी टीकेचा सामना करीत त्यातून सकारात्मक प्रेरणा घेणारा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गवसलेला ‘नवा हिरो’ असल्याचे कौतुक टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी शुक्रवारी केले. ऐतिहासिक मालिका विजयात निर्णायक भूमिका बजाविणाऱ्या २६ वर्षांच्या सिराजने कसोटी मालिकेत १३ गडी बाद केले. सिराजच्या वडिलांचे २० नोव्हेंबरला फुफ्फुसाच्या विकाराने निधन झाले त्यावेळी सिराज गोलंदाजीचा सराव करीत होता. त्याला मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला मात्र तो संघासोबत थांबला. भारतासाठी आपल्या मुलाने खेळावे ही पित्याची इच्छा सिराजने पूर्ण केली, मात्र त्याचा हा पराक्रम पाहण्यास वडील मोहम्मद गौस हयात नाहीत.सिडनीत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत सिराजला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. काही प्रेक्षकांनी त्याला ‘ब्राऊन मंकी’ असे संबोधले होते. शास्त्री यांनी सिराजच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांनी ट्विट केले, ‘वेगवान गोलंदाजीचा स्तर उंचावणारा सिराज या दौऱ्याचा शोध आहे. त्याने वैयक्तिक हानीनंतर वर्णद्वेषी अपमान सहन केला. हाच अपमान त्याला कामगिरी उंचावण्यास प्रेरणास्पद ठरला. दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने अनुभवी गोलंदाजांची उणीव जाणवू दिली नाही. ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीत वेगवान माऱ्याचे नेतृत्व करीत दुसऱ्या डावात पहिल्यांदा पाच बळी घेतले. गाबा कसोटीत त्याने १५० धावात एकूण ७ गडी बाद केले.सिडनीत प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शिवीगाळ केल्याची तक्रार भारतीय संघाने पंचांकडे केल्यानंतर कसोटी सामना सोडून देण्याचा पर्याय पंचांनी सुचविला होता. मात्र काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे याने फेटाळून लावला होता, असे सिराजने गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याशिवाय सिराजने भारतात पाय ठेवताच घरी न जाता आंतरराष्ट्रीय विमानतळाहून थेट दफनभूमीकडे धाव घेत पित्याच्या कबरीवर फुले वाहिली होती.‘या दौऱ्यात मोहम्मद सिराजने बरेच काही सहन केले. पितृछत्र गमावल्यानंतरही दु:ख झेलून तो संघासोबत कायम राहिला. वर्णद्वषी शिवीगाळ सहन केली. मात्र स्वत:च्या खेळावर विपरीत परिणाम होऊ दिला नाही. संघाच्या ऐतिहासिक मालिका विजयात सिराजचे मोलाचे योगदान आहे.’- रवी शास्त्री, मुख्य कोच
मालिका गमावल्याचे दु:ख - पाँटिंग ऑस्ट्रेलिया संघाने मायदेशामध्ये भारताविरुद्ध मालिका जिंकली नाही, त्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने म्हटले आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळलेल्या दुय्यम भारतीय संघाविरुद्ध मालिका गमावल्याचे शल्य आहे, असेही पाँटिंगने सांगितले.