मुंबई : २००७ चा टी२० विश्वचषक आठवला ही समोर राहतो तो युवराज सिंगच्या एका षटकातील सहा षटकारांचा प्रसंग. इंग्लंडचा गोलंदाज वेगवान स्टुअर्ट ब्रॉड हा रडायचा बाकी होता. पण, ब्रॉडच्या या दयनीय अवस्थेला इंग्लंडचा अँड्य्रू फ्लिंटॉफ जबाबदार असल्याचे गुपीत युवराजने सांगितले. ‘फ्लिंटॉफने मला डिवचले नसते, तर कदाचित ब्रॉडची अशी धुलाई झाली नसती,’ असे युवी म्हणाला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात तो बोलत होता.
इंग्लंड वि. भारत सामन्यात फ्लिंटॉफने युवराजला डिवचले. त्यामुळे युवीला हे सहन झाले नाही. तो फ्लिंटॉफशी भिडायला गेला. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीही मैदानात होता. युवी हातात बॅट घेऊन फ्लिंटॉफच्या दिशेने जायला लागला, पण पंचांनी त्याला रोखले. यानंतर हा राग त्याने ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा षटकार ठोकून काढला.
याविषयी युवी म्हणाला, ‘सामन्यात केवळ तीन षटके शिल्लक असताना मी मैदानावर आलो. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्यापलीकडे मला पर्याय नव्हता. त्यात फ्लिंटॉफने मला डिवचले. त्याच्या कृत्याने मी चवताळलो आणि राग ब्रॉडवर काढला.’
आगामी विश्वचषकात भारत जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण, युवराजचे मत थोडं वेगळ आहे. त्याच्या जेतेपदाच्या दावेदारांत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. युवी म्हणाला, ‘भारतीय संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहे. पण, माझ्यासाठी इंग्लंड अव्वल आहे. ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज हेही अनपेक्षित निकाल नोंदवू शकतात. डेव्हिड वॉर्नर व स्टीव्हन स्मिथच्या पुनरागमनाने ऑसी मजबूत झाले आहे. विंडीजचा काही नेम नाही. त्यांची कामगिरी कोणत्या क्षणी कशी होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.’ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोणते संघ धडक मारतील, या प्रश्नावर युवराज सिंग म्हणाला की, ‘यामध्ये मी पहिले नाव इंग्लंडचे घेईन.. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे अंतिम चारमध्ये प्रवेश करतील. पण, चौथा संघ कोणता असेल हे आता सांगणे अवघड आहे.’
Web Title: Six sixes in six balls, Flintoff was the facilitator
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.