कोलकाता : भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन हा सध्या वडोदरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत आहे. 28 डिसेंबरला झालेल्या रस्ता अपघातात त्याच्या फुप्फुस आणि यकृताला गंभीर दुखापत झाली आहे. मार्टिनच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची विनंती केल्यानंतर अनेक क्रिकेटपटू पुढे आले. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही मार्टिनला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आश्वासन त्याने मार्टिन कुटुंबीयांना दिले आहे.
बडोदाला रणजी करंडक जिंकून देणारा मार्टिन सध्या व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्या पत्नीनं उपचाराच्या खर्चासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र पाठवले होते. त्यानंतर बीसीसीआयने 5 लाख आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनने 3 लाखांची मदत जाहीर केली. 1999 मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली मार्टिनने भारतीय वन डे संघात पदार्पण केले होते. मार्टिनने दहा वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गांगुली म्हणाला,''मार्टिन आणि मी एकत्र खेळलो आहोत. तो खूप शांत आणि अंतर्मुख व्यक्ती होता. तो लवकरात लवकर बरा व्हावा, ही प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांना मी सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाही.''
बडोदा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव संजय पटेल हे मार्टिनच्या मदतीला धावून आले होते. त्यानंतर त्यांनी क्रिकेट क्षेत्रातील अनेक मित्रांना मदतीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान राखत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासह इरफान पठाण, युसूफ पठाण आणि मुनाफ पटेल हेही मदतीसाठी पुढे आले आहेत.
मार्टिनने 10 वन डे सामन्यांत 22.57च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत. त्याने पाच सामने हे गांगुलीच्या आणि अन्य पाच सामने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळले. 138 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 9192 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली बडोदाने 2000-2001 मध्ये पहिल्यांदा रणजी करंडक उंचावला.