कोलकाता : ‘आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यादरम्यान जेव्हा कधी मधल्या षटकांमध्ये बळींची गरज भासते, तेव्हा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कायम आक्रमक पर्याय ठरतो,’ असे मत भारताचा टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले. न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्विप दिल्यानंतर रोहितने गोलंदाजांच्या कामगिरीला सकारात्मक बदल म्हटले.
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेद्वारे तब्बल चार वर्षांनी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन केलेल्या अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केली. त्याने मधल्या षटकांमध्ये धावांवर अंकुश लावतानाच बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित म्हणाला की, ‘अश्विन कायम कर्णधारासाठी आक्रमक पर्याय ठरतो. जेव्हा तुमच्याकडे त्याच्यासारखा गोलंदाज असतो, तेव्हा तुम्हाला मधल्या षटकांमध्ये बळी घेण्याची संधी मिळते. मधल्या षटकांमधील खेळ अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. दुबईत खेळल्यानंतरच त्याने शानदार पुनरागमन केले आहे. तो शानदार गोलंदाज असून त्याची क्षमता आपल्या सर्वांनाच माहीत आहे.’
रोहित पुढे म्हणाला की, ‘गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याचा रेकॉर्ड खराब नाही. दुबई आणि मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्याची क्षमता दिसून आली. मधल्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश लावणे आणि बळी मिळवणे महत्त्वपूर्ण ठरते. अश्विनने अक्षर पटेलसोबत आमच्यासाठी हेच काम केले. मधल्या षटकांमध्ये बळी मिळवण्यासाठी आमच्याकडे या दोघांचा पर्याय आहे.’
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर संघाला विजयी मार्गावर आणण्याबाबत रोहितने सांगितले की, ‘प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत संघात सकारात्मक आणि आनंदी वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. खेळाडूंनी मोकळेपणे खेळावे यासाठी त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. संघाच्या पहिल्याच बैठकीत आम्ही खेळाडूंना सांगितले होते की, जर संघासाठी तुम्ही काही करत असाल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही.’
या मालिकेत आमची गोलंदाजी सर्वात सकारात्मक बाब ठरली. आम्ही पहिल्या दोन सामन्यांत न्यूझीलंडला आक्रमक सुरुवातीनंतरही मर्यादित धावसंख्येत रोखले. हे शानदार पुनरागमन ठरले. न्यूझीलंडसारख्या मजबूत संघाला १६० धावांच्या आसपास रोखणे अत्यंत कौतुकास्पद आहे. - रोहित शर्मा