दुबई - आयपीएलच्या 13व्या पर्वातील 22वा सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला आहे. हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबचा 69 धावांनी पराभव केला. हैदराबादचा हा पंजाबविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी गतवर्षी हैदराबादने पंजाबला 45 धावांनी पराभूत केले होते. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (52) आणि जॉनी बेअरस्टो (97) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने 201 धावा करत पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यानंतर प्रत्युत्तरसाठी मेदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाला 16.5 षटकांत केवळ 132 धावाच करता आल्या.
या विजयाबरोबरच हैदराबाद गुणतालिकेत आता तिसऱ्या क्रमांकावर पहोचला आहे. या सामन्यात जॉनी बेअरस्टोने धडाकेबाज 97 धावा केल्या, तर राशिद खानने 3 बळी मिळवले.
वॉर्नर-बेअरस्टो यांच्यात 1000+ धावांची भागीदारी -कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबाद संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनीही पावर-प्लेदरम्यान 58 धावांची खेळी केली. ही या पर्वातील हैदराबाद संघाची पावर-प्लेमधील सर्वाधिक धाव संख्या आहे. याच बरोबर वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्यात एकूण 16 डावांत एक हजारहून अधिक धानवांची भागीदारी झाली आहे. यादरम्यान या दोघांनीही 5 वेळा शतकी तर 5 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.
पूरनचे हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक - पंजाबच्या निकोलस पूरनने या सामन्यात केवळ 17 चेंडूत अर्धशतक ठोकले. या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. पूरनने 37 चेंडूत 77 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत पूरनने 5 चौकार आणि 7 छटकार खेचले. त्याला राशिद खानने बाद केले. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक केले होते. तर मुंबई इंडियंसच्या किरोन पोलार्डने रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरूविरुद्ध खेळताना 20 चेंडूत अर्धशतक केले होते.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक फटकावण्याचा मान लोकेश राहुलच्या नावावर आहे. राहुलने केवळ 14 चेंडूत अर्धशतक फटकावले होते. तसेच पुरनने फटकावलेले अर्धशतक हे किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आतापर्यंतच्या इतिहासात फटकावण्यात आलेले दुसरे वेगवान अर्धशतक ठरले आहे.
पंजाबने पावर-प्लेमध्येच गमावले 2 फलंदाज - हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. लयीत दिसणार मयंक अग्रवाल डावाच्या दुसऱ्या षटकातच 9 धावा करून तंबूत परतला. यानंतर आलेला प्रभसिमरन सिंहदेखील फारसे काही करू शकला नाही आणि खलील अहमदच्या चेंडूवर 11 धावा करून बाद झाला. यानंतर लोकेश राहुल आणि निकोलस पूरनने संघाची धावसंख्या 6 षटकांत 45 धावांपर्यंत पोहोचवली. लोकेश राहुलला अभिषेक शर्माने केन विल्यम्सनच्या हाताने झेलबाद केले. राहुललाही केवळ 11 धावाच करता आल्या. तर ग्लेन मॅक्सवेलदेखील 7 धावा करून तंबूत परतला. पंजाबने आजच्या सामन्यासाठी संघात 3 बदल केले होते, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
IPL 2020 : ...तर अधिक रोमांचक होईल टी-20 क्रिकेट, सुनील गावसकरांनी दिला 'या' बदलांचा सल्ला
फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात बरोबरीचा सामना -यावेळी, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या पर्वाचे आयोजन भारताऐवजी यूएईमध्ये करण्यात आले आहे. आतापर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, या स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात बरोबरीचा सामना होताना दिसत आहे. या स्पर्धेत काही फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. तर काही गोलंदाजांनी अनेक वेळा आपल्या बळावर सामन्याचा रोख आपल्या संघाकडे वळवल्याचेही दिसून आले आहे.