Bangladesh and Sri Lanka 2nd Test : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे सत्र सुरू ठेवले. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तीन खेळाडूंना मिळूनही एक झेल टीपता आला नसल्याची घटना ताजी असताना आता तर ५ खेळाडू एक चेंडू अडवण्यासाठी पळताना दिसले. त्यामुळे अनेकांना लगान चित्रपटातील प्रसंग आठवला. या सामन्यात श्रीलंकेने भीमपराक्रम नोंदवला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५३१ धावा उभ्या केल्या आणि भारताचा ४८ वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला गेला. श्रीलंकेच्या ५३१ धावांमध्ये एकाही फलंदाजाचे शतक पूर्ण झालेले नाही. यापूर्वी १९७६ मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध ९ बाद ५२४ धावांवर डाव घोषित केला होता. एकाही फलंदाजाचे शतक न होता उभ्या राहिलेल्या या सर्वोत्तम धावा होत्या. पण, हा विक्रम आता श्रीलंकेच्या नावावर झाला आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १७८ धावांवर गडगडला. झाकीर हसन ( ५४) व मोमिनूल हक ( ३३) हे त्यांच्याकडून चांगले खेळले.
श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो ( ४-३४) सर्वाधिक विकेट्स घेतल्या, तर विश्वा फर्नांडो, लाहिरु कुमारा व प्रभात जयसुरिया यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात श्रीलंकेची अवस्था ६ बाद १०२ अशी झाली आहे. निशान मदुश्काने ३४ धावा केल्या, तर अँजेलो मॅथ्यून ३९ धावांवर खेळतोय. हसन महमूदने ४ विकेट्स घेतल्या व खालेद अहमदने २ बळी टिपले.