लंकेची फलंदाजी ढेपाळली, आश्विनचे चार बळी, जडेजा व ईशांतने केले प्रत्येकी तीन गडी बाद

नागपूर : ‘सुंभ जळला तरी पीळ कायम’ याची प्रचिती व्हीसीए जामठाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसाच्या खेळानंतर आली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:56 AM2017-11-25T03:56:10+5:302017-11-25T03:56:29+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lankan batting collapses, Ashwin's four wickets, Jadeja and Ishant make three wickets each | लंकेची फलंदाजी ढेपाळली, आश्विनचे चार बळी, जडेजा व ईशांतने केले प्रत्येकी तीन गडी बाद

लंकेची फलंदाजी ढेपाळली, आश्विनचे चार बळी, जडेजा व ईशांतने केले प्रत्येकी तीन गडी बाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : ‘सुंभ जळला तरी पीळ कायम’ याची प्रचिती व्हीसीए जामठाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसाच्या खेळानंतर आली. हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना खेळपट्टीने आपला मूळ स्वभाव कायम ठेवत फिरकीपटूंना अधिक झुकते माप दिले. निमित्त होते भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या दुसºया कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळाचे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन (४-६७) व रवींद्र जडेजा (३-५६) आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (३-३७) यांच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळत पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. श्रीलंकेतर्फे करुणारत्ने (५१)व चांदीमल (५७) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली, पण त्यांना अन्य सहकाºयांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. फिरकीपटूंनी सात बळी घेतले तर वेगवान गोलंदाज ईशांतने ३ बळी घेत त्यांना योग्य साथ दिली. लोकल बॉय उमेश यादवने चांगला मारा केला असला तरी बळीचा विचार करता त्याची पाटी कोरीच राहिली. प्रत्युत्तरात भारताने दिवसअखेर १ बाद ११ धावा केल्या. आजचा खेळ थांबला त्यावेळी २ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या मुरली विजय याला चेतेश्वर पुजारा (२) साथ देत होता. के.एल. राहुलला (७) गमागेने तंबूचा मार्ग दाखविला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. समरविक्रमा (१३) याला ईशांतने माघारी परतवत भारताला पहिले यश मिळवून दिले. थिरिमानेचा अडथळा (९) आश्विनने दूर केला. दोनदा सुदैवी ठरलेल्या करुणारत्नेने उपाहारापर्यंत मात्र पडछड होऊ दिली नाही. दुसºया सत्रात जडेजाने अँजेलो मॅथ्यूजचा (१०) अडथळा दूर करीत भारताला तिसरे यश मिळवून दिले. करुणारत्नेने त्यानंतर कर्णधार दिनेश चांदीमलच्या साथीने धावफलक हलता ठेवला. उमेशच्या गोलंदाजीवर कव्हरमधून चौकार ठोकत कारकिर्दीत तीन हजार धावांचा पल्ला गाठणारा चांदीमल व कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक पूर्ण करणारा करुणारत्ने यांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. अनुभवी ईशांतने करुणारत्नेला (५१) पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. करुणारत्नेने पंचाच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेतला, पण तिसºया पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय कायम राखला. उपाहारापर्यंत २७ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ४७ धावा करणाºया श्रीलंकेने दुसºया सत्रात ३२ षटकांत १०४ धावांच्या मोबदल्यात आणखी दोन बळी गमावले. चहापानानंतर मात्र श्रीलंकेचा डाव गडगडला. जडेजाच्या गोलंदाजीवर आत्मघाती फटका मारून डिकवेला (२४)तंबूत परतला. शनाका (२) व परेरा (१५) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यांना अनुक्रमे आश्विन व जडेजाने बाद केले. कर्णधार चांदीमल अश्विनविरुद्ध रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पायचित ठरला. त्यानंतर लकमलला ईशांतने तर हेराथला अश्विनने माघारी परतवत श्रीलंकेचा डाव गुंडाळला.
त्याआधी, यजमान भारताने पहिल्या कसोटी सामन्यात खेळविलेल्या संघात तीन बदल केले. मुरली विजय, रोहित शर्मा व ईशांत शर्मा यांना अनुक्रमे शिखर धवन, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांच्या स्थानी अंतिम संघात संधी दिली. मोहम्मद शमीला दुखापत झाल्याचे विराटने सामन्यापूर्वी स्पष्ट केले. पाच गोलंदाजांना संधी देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणाºया विराटने यावेळी मात्र सात फलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.
>धावफलक
श्रीलंका पहिला डाव :- सदिरा समरविक्रमा झे. पुजारा गो. ईशांत १३, दिमुथ करुणारत्ने पायचित गो. ईशांत ५१, लाहिरू थिरिमाने त्रि. गो. अश्विन ०९, अँजेलो मॅथ्यूज पायचित गो. जडेजा १०, दिनेश चांदीमल पायचित गो. अश्विन ५७, निरोशन डिकवेला झे. ईशांत गो. जडेजा २४, दासुन शनाका त्रि. गो. अश्विन ०२, दिलरुवान परेरा पायचित गो. जडेजा १५, रंगना हेराथ झे. रहाणे गो. अश्विन ०४, सुरंगा लकमल झे. साहा गो. ईशांत १७, लाहिरू गमागे नाबाद ००. अवांतर (३). एकूण ७९.१ षटकांत सर्वबाद २०५. बाद क्रम : १-२०, २-४४, ३-६०,४-१२२, ५-१६०, ६-१६५, ७-१८४, ८-१८४, ९-२०५, १०-२०५. गोलंदाजी : ईशांत शर्मा १४-३-३७-३, उमेश यादव १६-४-४३-०, रविचंद्रन अश्विन २८.१-७-६७-४, रवींद्र जडेजा २१-४-५६-३.
भारत पहिला डाव :- के.एल. राहुल त्रि.गो. गमागे ०७, मुरली विजय खेळत आहे ०२, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ०२. अवांतर (०). एकूण ८ षटकांत १ बाद ११. बाद क्रम :
१-७. गोलंदाजी : सुरंगा लकमल ४-१-७-०, लाहिरू गमागे ४-२-
४-१
>सुदैवी करुणारत्ने
अश्विनच्या गोलंदाजीवर करुणारत्नेचा उडालेला झेल मिडआॅनवर तैनात पुजाराला टिपण्यात अपयश आले. त्यावेळी तो वैयक्तिक १५ धावांवर खेळत होता. त्यानंतर जडेजाच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर तो यष्टिचित झाला, पण तो चेंडू नोबॉल होता.
>उमेशचा
अचूक मारा
व्हीसीएवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाºया उमेशने पहिल्या स्पेलमध्ये भेदक मारा केला. त्याने ८ षटकांच्या या स्पेलमध्ये तीन निर्धाव षटके टाकताना केवळ १२ धावा दिल्या. उमेशने या स्पेलमध्ये दोन्ही सलामीवीरांसह थिरिमानेचीही चाचणी घेतली. लोकल बॉय असल्यामुळे उमेशचे स्थानिक चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले.

Web Title: Sri Lankan batting collapses, Ashwin's four wickets, Jadeja and Ishant make three wickets each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.