ठळक मुद्दे तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 1-0ने जिंकली.रोशन सिल्वा आणि डिकवेलाने सहाव्या विकेटसाठी नाबाद 94 धावांची भागीदारी केली.
नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेमधील तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णीत सुटला आहे. चौथ्या दिवशी कसोटीवर पकड मिळवणार भारतीय संघ पाचव्या आणि अखेरच्या दिवशी श्रीलंकेचे फक्त दोन गडी बाद करु शकला. भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. डाव संपताना श्रीलंकेच्या पाचबाद 299 धावा झाल्या होत्या.
धनंजय डिसिल्वाची शतकी खेळी (119) त्यानंतर रोशन सिल्वाची नाबाद अर्धशतकी खेळी (74) आणि डिकवेलाच्या नाबाद (44) धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने तिसरा कसोटी सामना वाचवला. तीन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने 1-0ने जिंकली. रोशन सिल्वा आणि डिकवेलाने सहाव्या विकेटसाठी नाबाद 94 धावांची भागीदारी केली. भारताकडून रविंद्र जाडेजाने सर्वाधिक तीन, शामी आणि अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी होती. धनंजय डिसिल्वाने शानदार शतक झळकावून श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. त्याने आणि कर्णधार दिनेश चांदीमलने पाचव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. चांदीमलला (36) धावांवर अश्विनने बोल्ड केले. डिसिल्वाने (119) धावांवर खेळत असताना दुखापतीमुळे मैदान सोडले.
चौथ्या दिवसअखेर भारताने श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले होते. कालच्या तीन बाद 31 वरुन आज सकाळी डाव पुढे सुरु झाल्यानंतर श्रीलंकेला चौथा धक्का बसला. पहिल्या डावातील शतकवीर अँजलो मॅथ्यूज अवघ्या 1 रन्सवर बाद झाला. जाडेजाने त्याला रहाणेकरवी झेलबाद केले. पाचव्यादिवसाच्या खेळावर भारत सहजतेने वर्चस्व गाजवेल ही अपेक्षा फोल ठरली.
भारताने काल पाच बाद 246 धावांवर डाव घोषित करुन श्रीलंकेसमोर विजयासाठी 410 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडे पहिल्या डावातील 163 धावांची आघाडी होती. अंधूक प्रकाशामुळे फिरोजशाह कोटलावर चौथ्या दिवसाचा खेळ निर्धारित १३ षटकांपूर्वी थांबविण्यात आला. श्रीलंकेने दुस-या डावात सलामीवीर सदीरा समरविक्रम (५) व दिमुथ करुणारत्ने (१३) यांच्या व्यतिरिक्त नाईटवॉचमन सुरंगा लकमल (००) यांच्या विकेट गमावल्या. समरविक्रमला मोहम्मद शमीने (१-८)स्लिपमध्ये तैनात अजिंक्य रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले तर करुणारत्ने जडेजाच्या (२-५) गोलंदाजीवर यष्टिरक्षक सहाकडे झेल देत माघारी परतला.
भारताने ३२ वा वाढदिवस साजरा करणारा सलामीवीर शिखर धवन (६७), कर्णधार विराट कोहली (५०), रोहित शर्मा (नाबाद ५०) आणि चेतेश्वर पुजारा (४९) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर दुसरा डाव ५ बाद २४६ धावांवर घोषित केला. फिरोजशाह कोटलावर कुठल्याही संघाला चौथ्या डावात ३६४ पेक्षा अधिक धावा फटकावता आलेल्या नाहीत. भारताने डिसेंबर १९७९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ६ बाद ३६४ धावा करत सामना अनिर्णीत राहिला होता.
या मैदानावर सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम भारत आणि वेस्ट इंडिज संघाच्या नावावर आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध २७६ धावांचे लक्ष्य गाठताना पाच बाद २७६ धावा केल्या होत्या आणि पाच गडी राखून विजय मिळवला होता. विंडीजने नोव्हेंबर १९८७ मध्ये तर भारताने नोव्हेंबर २०११ मध्ये अशी कामगिरी केली होती.
Web Title: Sri Lankan saved the game, India took just two wickets in the day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.