नवी दिल्ली - तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी पाहुण्या श्रीलंकेच्या फलंदाजांची यथेच्छ धुलाई केल्यानंतर भारताने आपला पहिला डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला. आज कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले झंझावाती द्विशतक आणि पहिल्या दिवशी मुरली विजयने ठोकलेले दीडशतक ही भारताच्या डावाची वैशिष्ट्ये ठरली. दरम्यान, श्रीलंकेच्या डावास निराशाजनक सुरुवात झाली असून, दिमुथ करुणारत्नेला शमीने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 18 धावा झाल्या होत्या. आज भारताने कालच्या 4 बाद 371 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर विराट कोहली आणि रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव राहिला. दरम्यान विराटने आपले कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक पूर्ण केले. तर रोहितनेही अर्धशतकाला गवसणी घातली. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी करत संघाला 500 धावांचा टप्पा ओलांडून दिला. उपाहाराला काही वेळ असतानाच रोहित 65 धावा काढून बाद झाला.उपाहारानंतर विराट कोहली त्रिशतकी मजल मारणार अशी अपेक्षा होती. मात्र ऐन मध्यान्ही मैदानात आलेले धुरके आणि त्याचे निमित्त करून श्रीलंकन खेळाडूंनी खेळास चालढकल करण्यास केलेली सुरुवात यामुळे विराटची लय बिघडली. त्यातच अश्विन आणि विराट (243) पाठोपाठ बाद झाले. अखेरीच विराटने भारताचा डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला. तत्पूर्वी, खेळाच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुस-या शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेविरुद्ध वर्चस्व मिळवित ९० षटकांत ४ बाद ३७१ धावा उभारल्या. दोघांनी तिस-या गड्यासाठी २८३ धावांची भागीदारीही केली. भारताच्या दोन फलंदाजांनी दिवसभरात प्रत्येकी दीडशे धावा ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने पहिल्या सत्रात २७ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ११६, दुस-या सत्रात ३० षटकांत गडी न गमाविता १२९ आणि तिस-या सत्रात ३३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावा वसूल केल्या. फलंदाजीला अनुकूल वाटणाºया कोटलाच्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल जिंकताच कोहलीने फलंदाजी घेतली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताचा डाव 536 धावांवर घोषित, श्रीलंकेची खराब सुरुवात
भारताचा डाव 536 धावांवर घोषित, श्रीलंकेची खराब सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 1:46 PM