महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली 56 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. पुणे तर महिलांमध्ये ठाणे वि. पुणे अंतिम फेरीत झुंजणार आहेत. तर या स्पर्धेत पुण्याला दुहेरी अजिंक्यपदाची मिळवण्याची संधी चालून आली आहे.
आज झालेल्या पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याने सांगली वर 20-18 (10-09, 10-09) असा अतिशय चुरशीच्या सामन्यात दोन गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात पुण्याच्या अक्षय गणपुलेने एक मिनिट तीस सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करून तीन खेळाडुंना बाद केले, सुयश गरगटेने एक मिनिट तीस सेकंद एक मिनिट संरक्षण करून चार खेळाडू बाद केले, सागर लेंगरेने दोन्ही डावात प्रत्यकी एक मिनिट तीस सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले आणि विजयश्री खेचून आणली. तर पराभूत सांगलीच्या सुरज लांडेने एक मिनिट चाळीस सेकंद व एक मिनिट संरक्षण करून पाच खेळाडू बाद केले, श्रीधर देसाईने एक मिनिट संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले व सुरेश सावंतने एक मिनिट व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण केले, अरुणने गुणकीने एक मिनिट संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले.
पुरुषांच्या दुसऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगर ने शेजारील ठाण्यावर 21-20 (11-10, 09-11) असा अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात एक गुणाने विजय मिळवला. मुंबई उपनगरच्या नितेश रुकेने एक मिनिट तीस सेकंद व एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले, ऋषिकेश मूर्चावडेने एक मिनिट वीस सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले, दुर्वेश साळुंखेने एक मिनिट संरक्षण करून सहा खेळाडू बाद केले व निहार दुबळेने तीन खेळाडुंना बाद करून विजयश्री अक्षरशः खेचून आणली. तर ठाण्याच्या प्रदीप जाधवने एक मिनिट व एक मिनिट वीस सेकंद संरक्षण करून पाच खेळाडू बाद केले, लक्ष्मण गवसने एक मिनिट पन्नास सेकंद संरक्षण करून चार खेळाडू बाद केले व संकेत कदमने दोन्ही डावात एक मिनिट दहा सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले तर निखिल वाघेने सुध्दा तीन खेळाडू बाद करून कडवी लढत दिली.
महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याने रत्नागिरीचा 9-07 (9-4 व 0-3) असे एक डाव दोन गुणांनी पराभव केला. पुण्याच्या स्नेहल जाधवने दोन्ही डावात प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण करून आक्रमणात तीन खेळाडू बाद केले, भाग्यश्री जाधवने एक मिनिट वीस सेकंद व नाबाद दोन मिनिटे संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. कोमल दारवटकरने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले, काजल भोरने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. तर प्रियंका इंगळे ने एक मिनिट पन्नास सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करून आक्रमणात तीन खेळाडू बाद केले, तर पराभूत रत्नागिरीच्या आरती कांबळेने एक मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. अपेक्षा सुतारने एक मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केल तर पल्लवी सनगलेने एक मिनिट दहा सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला.
महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाण्याने उस्मानाबादवर 10-09 (05-04, 05-05) असा अडीच मिनिटे राखून एक गुणाने विजय मिळवला. या सामन्यात ठाण्याच्या रेश्मा राठोडने तीन मिनिटे व दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करून आक्रमणात तीन खेळाडू बाद केले, रूपाली बडेने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले, तेजश्री कोंडाळकरने दोन मिनिटे व नाबाद एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला तर अश्विनी मोरेने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केल. पराभूत उस्मानाबादच्या निकिता पवारने दोन मिनिटे संरक्षण करून दोन खेळाडू बाद केले, जानवी पेठेने एक मिनिट पन्नास सेकंद व दोन मिनिटं संरक्षण केले, ऋतुजा खरेने एक मिनिट पन्नास सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करून आक्रमणात दोन खेळाडू बाद केले.
श्रीकांत ढेपे यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या गौरवाच्या निमित्तानं 56 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेला आहे. ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील / जीवनातील 40 वर्ष खो-खोला समर्पित केलेलं आहे. त्या व्यक्तीच्या गौरवार्थ ही स्पर्धा येथे होते आहे आणि त्या गौरवाच्या निमित्तानं होणारी ही स्पर्धा देखील तशीच साजेशी सुध्दा झाली आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन व नियोजन “उत्कर्ष क्रीडा मंडळ, सोलापूर” यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तर्फे मा. श्रीकांत ढेपे यांचा भव्य-दिव्य असा सत्कार करण्यात आला.
Web Title: State level Kho-Kho tournament: Pune team in final of men and women category
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.