नवी दिल्ली : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. क्रिकेट विश्वासाठी हा मोठा धक्का होता. पण आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून पुनरागमन करू शकतात, अशी माहिती मिळाली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २२ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील बंदी २९ मार्चला संपणार आहे. त्यानुसार स्मिथ आणि वॉर्नर हे चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकतात.
... तरीही संधी मिळणार का?स्मिथ आणि वॉर्नर हे दोघेही सध्याच्या घडीला जायबंदी आहेत. स्मिथला तर शस्त्रक्रीयाही करावी लागली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मिथ आणि वॉर्नर खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण आगामी विश्वचषक पाहता, या दोन्ही महत्वाच्या खेळाडूंना क्रिकेट मंडळ जास्त क्रिकेट खेळवणार नाही, असे वाटत आहे.
काय होते नेमके प्रकरण...
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
आयपीएलमध्येही खेळण्याचा मार्ग मोकळा
आयसीसी आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने बंदी घातल्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये स्मिथ आणि वॉर्नर यांना खेळता आले नव्हते. पण त्यांची बंदी एका वर्षात उठल्यानंतर ते आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात. सनराइजर्स हैदराबाद या संघाकडून वॉर्नर आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून स्मिथ खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.