मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आजच्या दिवशीच एक पराक्रम केला होता. त्यामुळेच त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्दनकाळ म्हणूनही संबोधले गेले होते. अॅशेस कसोटी मालिकेत 2015 साली विक्रमी स्पेल टाकत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली होती.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ट्रेंट ब्रिज येथे अॅशेस कसोटी मालिका सुरु होती. या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी ब्रॉडने भेदक आणि अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 60 धावांत खुर्दा उडवला होता. या डावात त्याने 9.3 षटकांत फक्त 15 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आठ फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळेच इंग्लंडला हा सामना एक डाव आणि 78 धावांनी जिंकता आला होता.