IPL 2023, SRH vs KKR statistics: आयपीएलचा हंगाम सध्या तुफान रोमांचक सुरू आहे. गेल्या चार दिवसात चार सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगले. त्यातील तीन सामने तर शेवटच्या चेंडूपर्यंतही पोहोचले. आजच्या सामन्यातही सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी रंगणार आहे. सामना इडन गार्डन्सच्या मैदानावर होणार असला तरी हैदराबादचा संघही तगडा आहे. त्यामुळे हैदराबादची काव्या मारन की कोलकाताची सुहाना खान, नक्की कुणाच्या चेहऱ्यावर हास्य उमटणार, हे सामनाच ठरवेल. त्याआधी पाहूया हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी...
हैदराबादचे ११ vs कोलकाताचे ३
हैदराबादच्या संघाचा आजचा सामना हा कोलकाताच्या तीन महत्त्वाच्या खेळाडूंशी होणार आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की हे तीन खेळाडू रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर किंवा आंद्रे रसेल असतील, तर तसं मूळीच नाही. कोलकाता नाईट रायडर्ससाठी त्यांचे तीन फिरकीपटू सामना फिरवण्याची क्षमता राखतात. ते म्हणजे सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा. IPL 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद हा एक चांगला संध असला तरी त्यांना काही वेळा अनुभवाची कमी जाणवते. त्यातच, हैदराबादने केवळ 3 सामन्यात फिरकी गोलंदाजीसमोर 12 विकेट गमावल्या आहेत.
केकेआरच्या फिरकी त्रिकुटाने एका डावात ९ विकेट घेतल्या होत्या. सनरायझर्स आणि कोलकाता यांच्यातील सामना ईडन गार्डन्सवर आहे. हे तेच मैदान आहे जिथे विराट, मॅक्सवेल आणि डुप्लेसी यांनी सजलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी कोलकात्याच्या फिरकी त्रिकुटाने उद्ध्वस्त केली होती.
SRH vs KKR आकडेवारी-
या दोन संघांमध्ये एकूण २३ सामने झाले आहेत. त्यापैकी १५ सामने कोलकाताने तर ८ सामने हैदराबादने जिंकले आहेत. कोलकाताने हैदराबाद विरूद्ध आतापर्यंत सर्वाधिक २०९ धावांचा स्कोअर उभारला आहे. तर हैदराबादने कोलकाता विरूद्ध सर्वोत्तम १८७ धावा केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांचा विचार करता, सहा पैकी पाच सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता कोलकाताचे पारडे जड दिसत असले तरी अंतिम फैसला मैदानातच होईल.