नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबण्याच्या स्थितीत भारत ऑस्ट्रेलियापुढे टी-२० विश्वकप स्पर्धेच्या अदलाबदलीचा प्रस्ताव ठेवू शकतो आणि २०२१ ऐवजी यंदा या स्पर्धेचे आयोजन होऊ शकते, असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.कोविड-१९ मुळे जगभर क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत आणि त्यात ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित २०२० टी-२० विश्वकप स्पर्धेच्या आयोजनाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. भारताला २०२१ मध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन करायचे आहे.गावस्कर म्हणाले, ‘आपल्याला कल्पना आहे की ऑस्ट्रेलियाने ३० सप्टेंबरपर्यंत देशात विदेशी नागरिकांना प्रवेशबंदी लागू केली आहे. स्पर्धा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे सध्यातरी या स्पर्धेचे आयोजन कठीण भासत आहे. पुढील वर्षी टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात होणार आहे. जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी सहमती दर्शविली आणि भारतात कोरोनाचा प्रभाव ओसरला तर स्पर्धांची अदलाबदल होऊ शकते. टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते आणि ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी याच वेळी ही स्पर्धा होईल.’आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे, पण या स्पर्धेची सप्टेंबर महिन्यात आयोजनाची शक्यता आहे. गावस्कर म्हणाले, ‘असे जर घडले तर टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पूर्वी आयपीएलचे आयोजन होऊ शकते. त्यामुळे खेळाडूंना पुरेसा सरावही मिळेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वकप आणि डिसेंबरमध्ये यूएईत आशिया कप स्पर्धेचे आयोजन होऊ शकते. यूएईमध्ये डिसेंबर स्पर्धा आयोजनासाठी चांगली वेळ आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'टी-२० विश्वकप स्पर्धेच्या आयोजनाची अदलाबदली व्हावी'
'टी-२० विश्वकप स्पर्धेच्या आयोजनाची अदलाबदली व्हावी'
भारत-ऑस्ट्रेलियाची सहमती आवश्यक; गावस्कर यांचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:58 AM