Syed Mushtaq Ali Trophy 2024, Saurashtra vs Madhya Pradesh, Quarter Final 3 Result : व्यंकटेश अय्यरची ऑल राउंडर कामगिरी, कॅप्टन रजत पाटीदारनं केलेली उपयुक्त खेळी अन् अखेरच्या षटकात भाटियाची फटकेबाजी याच्या जोरावर मध्य प्रदेशच्या संघानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सौराष्ट्रच्या संघाने दिलेल्या १७४ धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेशच्या संघानं ६ विकेट्स राखून विजय नोंदवला.
सौराष्ट्र संघानं सेट केलं होतं १७४ धावांचे टार्गेट
अलूर क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्र संघानं पहिल्यांदा फलंदाजी केली. सौराष्ट्र संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. ७२ धावांत संघानं ४ विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना चिराग जानीनं दमदार खेळी करत ८ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ४५ धावांत नाबाद ८० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर सौराष्ट्र संघानं निर्धारित २० षटकात ७ बूाद १७३ धावा करत देवदत्त पडिक्कलच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघासमोर १७४ धावांचे टार्गेट सेट केले होते. गोलंदाजीत मध्य प्रदेशकडून व्यंकटेश अय्यर आणि आवेश खान या टीम इंडियाकडून खेळलेल्या भिडूंनी सर्वाधिक २-२ विकेट्स पटकावल्या.
अखेरच्या षटकात ट्विस्ट, भाटीयानं तुफान फटकेबाजी करत संघाला जिंकून दिला सामना
या धावसंख्येचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा सलामीवीर अर्पित गौड याने २९ चेंडूत ४२ धावांची दमदार खेळी केली. हर्ष गवली ११ (११), सुभरांशु सेनापती २४ (१६) धावा करून तंबूत परतल्यावर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी संघाचा डाव सावरला. दोघे सामना संपवतील असे वाटत असताना सामन्यात ट्विस्ट आला. सौराष्ट्र संघाचा कॅप्टन जयदेव उनादकट याने रजत पाटीदारला २८ धावांवर बाद केले. ही विकेट पडल्यावर सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. मात्र व्यंकटेश अय्यर ३३ चेंडूत नाबाद ३८ धावा करून शेवटपर्यंत क्रिजवर थांबला. दुसऱ्या बाजूला कॅप्टनची जागा घेण्यासाठी आलेल्या हरप्रीत सिंग भाटियानं ९ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार खेचस २२ धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Web Title: Syed Mushtaq Ali Trophy 2024 Venkatesh Iyer Harpreet Singh Bhatia Show Madhya Pradesh Beat Saurashtra In Quarter Final 3 And Enter To Semi Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.