चिन्नाप्पमपट्टी :भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभव केला. संघातील क्रिकेटपटूंचे त्यांच्या शहरात आणि गावात जोरदार स्वागत केले जात आहे. अजिंक्य रहाणेचे सोसायटीमधील सर्व लोकांनी जंगी स्वागत केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मुंबईच्या अन्य खेळाडूंचे विमानतळावर जोरदार स्वागत झाले. दौऱ्यात एका खेळाडूने खास विक्रम केला.
टी. नटराजन याचा नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला होता. पण दौरा संपल्यानंतर मात्र त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला गेला. एका दौऱ्यात तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नटराजनची कामगिरीदेखील शानदार ठरली. त्याचे स्वागतदेखील सर्वात हटके झाले. नटराजन सालेम येथील चिन्नाप्पमपट्टी गावात पोहोचला तेव्हा त्याचे स्वागत असे करण्यात आले जणू तो भारतीय संघाला विजय मिळवून देणारा कर्णधार आहे.
सालेममध्ये त्याला रथामध्ये बसवण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावरून नटराजनची लोकप्रियता किती वाढली आहे याची कल्पना येते. एका छोट्या गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या नटराजनच्या या यशाबद्दल गावातील लोकांना प्रचंड आनंद झाला होता.
सर्व जण ‘नटराजन, नटराजन’ -
अशा घोषणा देत होते. स्वागतासाठी उपस्थित चाहते फोटो आणि व्हिडिओ शूट करत होते. गावातील लोकांनी ढोल-ताशात नटराजनला घरापर्यंत सोडले. स्वागताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेदेखील हा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले.
अश्विन, वाॅशिंग्टन सुंदर यांचेही आगमन
चेन्नई : ऑस्ट्रेलियात मालिका विजेत्या भारतीय संघातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांचे शुक्रवारी मायदेशात आगमन झाले. तामिळनाडू सरकारच्या कोविड नियमावलीनुसार दोन्ही खेळाडूंना पुढील दोन दिवस विलगीकरणात वास्तव्य करावे लागेल. अश्विनने पहिल्या तीन कसोटीत १२ गडी बाद केले. तिसऱ्या कसोटीत अनुमा विहारीसोबत ६२ धावांची नाबाद भागीदारी करीत त्याने पराभव टाळला होता. वॉशिंग्टनने चौथ्या सामन्यात पहिल्या डावात ६२ धावा करीत शार्दूल ठाकूरसोबत १३३ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात त्याने चार गडी बाद केले. या दोन्हीही खेळाडूंना इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे.
Web Title: T. Natarajan's 'Hatke' welcome like captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.