शारजा, टी-10 लीग : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पखतून्स संघाने विजय मिळवला. आंद्रे फ्लेचरची तडाखेबंद फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर पख्तून्स संघाने सिंधीस संघावर आठ धावांनी विजय मिळवला.
पखतून्स संघाचा सलामीवीर आंद्रे फ्लेचरने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. फ्लेचरच्या या खेळीच्या जोरावर सिंधीस संघाविरुद्ध खेळताना पखतून्सला 20 षटकांत 6 बाद 137 अशी धावसंख्या उभारता आली.
पखतून्स संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिंधीस संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. पण कर्णधार शेन वॉटसनने 14 चेंडूंत 29 धावांची खेळी साकारत संघाचे आव्हान कायम ठेवले होते. शेन बाद झाल्यावर थिसारा परेराने फक्त 13 षटकांत सात षटकारांच्या जोरावर 47 धावा फटकावत सिंधीस संघाला विजयासमीप आणले होते. पण मोक्याच्या क्षणी परेरा बाद झाला आणि संघास पराभवाला सामोरे जावे लागले.