शारजा, टी-10 लीग : बंगाल टायगर्सने गुरुवारी झालेल्या सामन्यात विजयी डरकाळी फोडली. या सामन्यात टायगर्सने नॉर्दन वॉरियर्स संघावर 36 धावांची दमदार विजय मिळवला.
वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून टायगर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. या संधीचा चांगलाच फायदा टायगर्सच्या फलंदाजांनी उचलला. जेसन रॉयने धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश करत 29 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद 60 धावांची धडाकेबाज खेळी साकरली. टायगर्सच्या शेर्फन रुदरफोर्डने 21 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकार लगावत नाबाद 47 धावांची खेळी केली. या दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे टायगर्स संघाला प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांमध्ये 1 बाद 130 अशी मोठी धावसंख्या उभारता आली.
टायगर्सच्या 131 धावांचा पाठलाग करताना वॉरियर्स संघाला 97 धावा करता आल्या आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. वॉरियर्सचा सलामीवीर लेंड सिमन्सने 44 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे वॉरियर्सला हा सामना गमवावा लागला. बंगालकडून आमेर अमीनने यावेळी हॅट्ट्रिकसह चार बळी मिळवले.