शारजा, टी-10 लीग : पखतून्स आणि नॉर्दर्न वॉरीयर्स यांच्यात टी-10 लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या जेतेपदाचा सामना आज होणार आहे. पखतून्सने वॉरियर्सवर विजय मिळवून अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवला होता. एलिमिनेशन फेरीत वॉरियर्सने मराठा अरेबियन्सचा सहज पराभव केला आणि जेतेपदाच्या लढतीत स्थान पक्के केले. या सामन्यात लीगमधील दोन स्फोटक फलंदाज समोरासमोर येणार आहेत. पखतून्सचा आंद्रे फ्लेचर आणि वॉरियर्सचा निकोलस पूरण यांच्यातील अव्वल स्थानासाठीची चढाओढ आज पाहायला मिळणार आहे.
शाहिद आफ्रिदीने पखतून्सला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. पखतून्सची सुरुवात निराशाजनक झाली होती, परंतु आफ्रिदीने नाबाद 59 धावा चोपून काढल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर पखतून्सने नॉर्दर्न वॉरियर्ससमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात वॉरियर्सच्या रोव्हमन पॉवेलने नाबाद 80 धावा केल्या, परंतु त्या विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा ठरल्या नाही. पखतून्सने 13 धावांनी विजय मिळवला.
एलिमिनेशनच्या सामन्यात वॉरियर्सने मराठा अरेबियन्सवर दहा विकेट राखून सहज विजय मिळवला. अर्ध्यातासाहून कमी कालावधीत दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरलेले अरेबियन्सचे खेळाडू थकलेले जाणवले. त्यांच्या फटक्यांत त्राणच जाणवत नव्हते. त्यामुळे त्यांना 10 षटकांत 72 धावा करता आल्या. वॉरियर्सने हे लक्ष्य 5 षटकांत पूर्ण केले. वॉरियन्सला अंतिम फेरीत पखतून्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात . पूरणने 16 चेंडूंत 43, तर लिंडल सिमन्सने 14 चेंडूंत 31 धावा केल्या.
पूरणने या खेळीसह टी-10 लीगच्या यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मान पटकावला आहे. त्याने 8 सामन्यांत 306 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या शर्यतीत फ्लेचर 267 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे आणि आजच्या सामन्यात तो पूरणला मागे टाकण्यासाठी प्रयत्न करणार. फ्लेचरने या धावा सात सामन्यांत केल्या आहेत आणि त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.