ठळक मुद्देअॅलेक्स हेल्सची नाबाद 87 धावांची वादळी खेळीजॉनी बेअरस्टोव्हचा 84 धावांचा विक्रम मोडलामराठा अरेबियन्सने 7 विकेट राखून विजय मिळवला
शारजा, टी-10 लीग : केरळ नाईट्सच्या जॉनी बेअरस्टोव्हने शुक्रवारी टी-10 लीगमध्ये सर्वाधिक वैयक्तिक 84 धावांचा नोंदवलेला विक्रम 24 तासांच मराठा अरेबियन्सच्या अॅलेक्स हेल्सने मोडला. हेल्सने 32 चेंडूंत 6 चौकार व 8 षटकार खेचून नाबाद 87 धावांची खेळी केली. टी-10 लीगमधली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. हेल्सच्या याच फटकेबाजीच्या जोरावर अरेबियन्सने शनिवारी बंगाल टायगर्सवर 7 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मराठा अरेबियन्सने नाणेफेक जिंकून बंगाल टायगर्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. टायगर्सला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज दुहेरी आकडा न गाठताच माघारी फिरले. सलामीवीर सुनील नरीनने एका बाजूने खिंड लढवताना संघाला मोठ्या धावसंख्येकडे कूच करून दिली. मात्र, सहाव्या षटकात ग्लिसनने नरीनला बाद केले. त्याने 18 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. नरीननंतर मोहम्मद नबीने अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नबीला रिकी वसेल्सची (17) चांगली साथ लाभली. ड्वेन ब्राव्होने नवव्या षटकात तीन विकेट घेतल्या. पण, नबीने 16 चेंडूंत 46 धावा करून आपले काम पूर्ण केले होते. त्यात पाच षटकार व 2 चौकारांचा समावेश होता. टायगर्सने 10 षटकांत 7 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली.लक्ष्याचा पाठलाग करताना अरेबियन्सचे दोन फलंदाज 28 धावांवर तंबूत परतले. मॉर्ने मॉर्केल आणि कूपर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अॅलेक्स हेल्सने एका बाजूने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. हेल्सने सहाव्या षटकात मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर 32 धावा चोपून काढल्या. नबीच्या एका षटकाने टायगर्सच्या हातून सामना निसटला. हेल्सने 32 चेंडूंत नाबाद 87 धावा केल्या. त्याला कर्णधार ड्वेन ब्राव्होने 9 चेंडूंत नाबाद 27 धावा करून उत्तम साथ दिली. अरेबियन्सने 136 धावांचे लक्ष्य 9.1 षटकातं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.