ठळक मुद्देनॉर्दर्न वॉरियर्सने टी-10 लीगचे जेतेपद पटकावलेनिकोलस पूरणच्या लीगमध्ये सर्वाधिक धावा हार्डस व्हिलजोईन लीगमधील यशस्वी गोलंदाज
शारजा, टी-10 लीग : नॉर्दर्न वॉरियर्सने टी-10 लीगमधील जेतेपदाच्या लढतीत पखतून्सचा 22 धावांनी पराभव केला. या विजयासह वॉरियर्सने बाद फेरीत झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. वॉरियर्सच्या 140 धावांचा पाठलाग करताना पखतून्स संघ 7 बाद 118 धावांपर्यंत मजल मारू शकला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान वॉरियर्सचा निकोलस पूरण ( 324) आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान हार्डस व्हिलजोईन (18) याने पटकावला.
जेतेपदाच्या सामन्यात लेंडल सिमन्स आणि निकोलस पूरण यांच्याकडून जोरदार फटकेबाजीची अपेक्षा होती. वॉरियर्सच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात या दोघांचा मोलाचा वाटा होता आणि त्यामुळेच अंतिम सामन्यात त्यांच्याकडे बऱ्याच जणांचे लक्ष लागले होते. मात्र, शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पखतून्सने निकोलस व सिमन्स यांना स्वस्तात बाद केले. या दोघांना माघारी पाठवल्यानंतर पखतून्सला मोहिम फत्ते झाल्याचे वाटले. पण, आंद्रे रसेल आणि रोव्हमन पॉवेल यांनी त्यांची झोप उडवली. दोघांनी 16 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. रसेलने तीन वेळा चेंडू स्टेडियमबाहेर टोलावला. अवघ्या सहा षटकांत वॉरियर्सने शतकी आकडा गाठला.
आफ्रिदीच्या गुगलीवर रसेल फसला आणि मोहम्मद इरफानच्या हातात झेल देत माघारी परतला. बाद झाल्यावर रसेलचा राग अनावर झाला होता. त्याने 12 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचत 38 धावा केल्या. त्यानंतर आतषबाजीची जबाबदारी पॉवेलने खांद्यावर घेतली. त्याने 18 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
शराफुद्दीन अश्रफने नवव्या षटकात वॉरियर्सच्या धावगतीवर किंचितसा चाप लावला. शेवटच्या षटकात सोहेल खानने कमाल केली. त्याने अखेरच्या षटकात वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत वॉरियर्सला केवळ 6 धावाच दिल्या. अखेरच्या चेंडूवर चार धावा गेल्या म्हणून वॉरियर्सला 3 बाद 140 धावांपर्यंत मजल मारता आली. टी-10 लीगमधील ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. पॉवेलने 25 चेंडूंत नाबाद 61 धावा केल्या. त्यात 8 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार डॅरेन सॅमीला 9 चेंडूंत 14 धावा करता आल्या.
कॅमेरोन डेलपोर्टला दुसऱ्याच षटकात ख्रिस ग्रीनने बाद करतना पखतून्सला पहिला धक्का दिला. वॉरियर्सने क्षेत्ररक्षणातही सरस खेळ करताना पखतून्सच्या धावगतीला लगाम लावला. तरीही आंद्रे फ्लेचर आणि शफिकुल्लाह यांनी चार षटकांत अर्धशतकी पल्ला गाठला. फ्लेचर आणि शफिकुल्लाह यांनी 21 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. ग्रीनने वॉरियर्सला दुसरे यश मिळवून दिले. त्याने फ्लेचरचा अडथळा दूर केला. फ्लेचरने 18 चेंडूंत 4 षटकार व 2 चौकार खेचत 37 धावा केल्या. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने सामन्यातील रंगच बदलला. त्याने हार्डस व्हिलजोईनला चार चेंडूंत 16 धावा चोपल्या, परंतु व्हिलजोईनने पाचव्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. आफ्रिदीने 7 चेंडूंत 17 धावा केल्या. व्हिलजोईनने पुढच्याच चेंडूवर पखतून्सला आणखी एक धक्का दिला. या धक्क्यातून पखतून्सला सावरणे कठीण गेले.
Web Title: T10 League: Northern Warriors won the T10 league title
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.