ठळक मुद्देपखतून्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश नॉर्दर्न वॉरियर्सवर 13 धावांनी विजयरोव्हमन पॉवेलची 80 धावांची खेळी व्यर्थ
शारजा, टी-10 लीग : शाहिद आफ्रिदीने पखतून्स संघाला टी-10 लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. पखतून्सची सुरुवात निराशाजनक झाली होती, परंतु आफ्रिदीने नाबाद 59 धावा चोपून काढल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर पखतून्सने नॉर्दर्न वॉरियर्ससमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात वॉरियर्सच्या रोव्हमन पॉवेलने नाबाद 80 धावा केल्या, परंतु त्या विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा ठरल्या नाही. पखतून्सने 13 धावांनी विजय मिळवला.
वॉरियर्सने नाणेफेक जिंकून पखतून्स संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पखतून्सचा आंद्रे फ्लेचर अवघ्या 14 धावांवर माघारी परतला. पखतून्सचे चार फलंदाज 57 धावांवर तंबूत परतले होते. त्यामुळे ते मोठी मजल मारू शकत नाही, असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला. हार्डस विलजोइनने दोन षटकांत 26 धावा देत पखतून्सच्या 3 फलंदाजांना माघारी पाठवले. मात्र, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार शाहिद आफ्रिदीने षटकारांची आतषबाजीच केली. त्याने अवघ्या 14 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात सहा षटकारांचाच समावेश होता. त्याच्या या खेळीने पखतून्सने 10 षटकांत 135 धावांचा डोंगर उभा केला. आफ्रिदीने 17 चेंडूंत 3 चौकार व 7 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 59 धावा कुटल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना निकोलस पूरण आणि आंद्र रसेल हे वॉरियर्सचे हुकूमी एक्के झटपट माघारी फिरले. वॉरियर्सची अवस्था 2 बाद 15 अशी झाली होती. मात्र, रोव्हमन पॉवेल आणि लेंडल सिमन्स यांनी वॉरियर्सचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात सिमन्सला बाद करून मोहम्मद इरफानने ही जोडी फोडली. सिमन्सने 16 चेंडूंत 1 षटकार व 3 चौकारांसह 24 धावा केल्या. पॉवेलने एका बाजूने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. पण, त्यांना अखेरच्या षटकात विजयासाठी 24 धावा हव्या होत्या. शराफुद्दीन अशरफने पहिल्याच चेंडूवर ड्वॅन स्मिथला त्रिफळाचीत केले. वॉरियर्सला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यांना 10 षटकांत 4 बाद 122 धावा करता आल्या. पॉवेल 35 चेंडूत 80 धावांवर नाबाद राहिला. त्यात चार चौकार व 9 षटकारांचा समावेश होता.
Web Title: T10 League: Pakhtoons won by 13 runs, enter in final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.