शारजा, टी-10 लीग : लीग सुरु व्हायला काही दिवसांचा अवधी राहीला होता. त्यावेळी दोन संघांची नावे बदलण्यात आली. चाहत्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते. पण अखेर या लीगमधील कराचियन्सचे सिंधीस कसे झाले, याचा उलगडा झाला आहे. या लीगचे अध्यक्ष शाजी उल मुल्क यांनी पाकिस्तानच्या एका गोष्टीमुळे आम्ही दोन संघांची नावे बदलली, असा खुलासा केला आहे.
टी-10 लीगचे हे दुसरे पर्व आहे. यावर्षी टी-10 लीगला आयसीसीनेही मान्यता दिली आहे. टी-10 लीगमध्ये कराचियन्स आणि केरला किंग्ज हे दोन संघ होते. पण या दोन्ही संघांची नावे बदलण्यात आली. कारण हे नाव बदलण्यासाठी पाकिस्तानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पाकिस्तान सुपर लीग ही गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या लीगमध्ये कराची किंग्स, या नावाचा एक संघ आहे. त्यामुळे दुसऱ्या लीगमध्ये हे शब्द वापरू शकत नाही, अशी याचिका पाकिस्तानने दाखल केली होती. त्यामुळे टी-10 लीगच्या आयोजकांनी कराचियन्स संघाचे नाव सिंधीस आणि केरला किंग्जचे नाव केरला नाईट्स असे केले आहे.
याबाबत या लीगचे अध्यक्ष शाजी उल मुल्क म्हणाले की, " पाकिस्तानने याबाबत एक याचिका दाखल केली आहे. त्यानुसार यावर्षी आम्ही या दोन संघांची नावे बदलली आहे. पण आम्ही याबाबत न्यायालयात लढा कायम देणार आहोत. आमच्याकडे यावर्षी फार कमी वेळ होता. त्यामुळे आम्ही दोन्ही संघांची नावे बदलली आहेत. पण यापुढे याबाबतीत आमचा लढा कायम राहील."