शारजा, टी-10 लीग : पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने टी-10 लीगला पाठिंबा दिला आहे आणि या लीगमुळे क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करेल, असाही विश्वास त्याने व्यक्त केला. आफ्रिदीचे हे टी-10 लीगमधील दुसरे वर्ष आहे आणि तो पखतून्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. दोन वर्षांत या लीगने मिळवलेल्या यशाने आफ्रिदी भारावून गेला आहे. तो म्हणाला,"ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी या योग्य पर्याय आहे. हा फॉरमॅट ऑलिम्पिकमध्ये खेळवून तुम्ही क्रिकेटचा योग्य प्रचार करु शकता. सर्व लोकं या फॉरमॅटचा मनमुराद आस्वाद लुटतील."
इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानेही गतवर्षी टी-10च्या उद्घाटनन सोहळ्यात असेच मत व्यक्त केले होते. तो म्हणाला होता," क्रिकेटच्या या फॉरमॅटवर तुम्ही ऑलिम्पिकसाठी प्रस्ताव ठेवू शकता. टी-20 फॉरमॅट बराच वेळ खातो आणि जेव्हा आपण ऑलिम्पिक समावेशाचा विचार करतो तेव्हा टी-10 हाच उत्तम पर्याय आहे. टी-10 क्रिकेटसाठी आठवड्याचा कालावधीही पुरेसा आहे."
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही दिवसांपूर्वी महिला क्रिकेटचा 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग व्हावा यासाठी अर्ज केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आफ्रिदीचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशासाठी आयसीसी पुढाकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 1900 च्या काळात क्रिकेटचा ऑलिम्पिक सर्धांत समावेश करण्यात आला होता. त्यात ग्रेट ब्रिटनने फ्रान्सला नमवून सुवर्ण जिंकले होते.
आफ्रिदी पुढे म्हणाला,''हा झटपट फॉरमॅट आहे आणि गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. गोलंदाजांना त्यांचे कौशल्य दाखवण्याचे हे व्यासपीठच आहे. टी-10मुळे क्रिकेट बदलेल. टी-20 आणि वन डे क्रिकेटमध्येही या लीगमुळे बदल पाहायला मिळतील. टी-10 मुळे क्रिकेट जगभरात पोहोचण्यात मदत मिळेल."