शारजा, टी-10 लीग : नॉर्दन वॉरियर्सने अचूक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजी करत राजपूत संघावर सहा षटकांमध्येच विजय मिळवला. राजपूतने वॉरियर्सपुढे 65 धावांचे आव्हान ठेवले होते. वॉरियर्सच्या निकोलस पुरनने 18 चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या मदतीने नाबाद 45 धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वॉरियर्सने हा सामना सात विकेट्स राखत जिंकला.
नॉर्दन वॉरियर्सने भेदक मारा करत राजपूत संघाला 64 धावांवर रोखण्याची किमया साधली. वॉरियर्स संघाकडून खॅरी पेरीने भेदक मारा करत दोन षटाकांमध्ये फक्त 10 धावा देत तीन बळी मिळवले होते. पेरीने अशी भेदक गोलंदाजी करत राजपूत संघाचे कंबरडे मोडले. वॉरियर्सने नाणेफेक जिंकत राजपूत संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या संधीचा चांगलाच फायदा वॉरियर्सच्या गोलंदाजांनी उचलला. पेरीने यावेळी अचूक मारा करत राजपूत संघाच्या धावसंख्येला खीळ बसवली.