हॅमिल्टन - डेवोन कॉनवेच्या नाबाद ९२ धावांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या टी-२० लढतीत बांगलादेशचा ६६ धावांनी पराभव केला.१२ व्या सामन्यात चौथे अर्धशतक झळकाविताना कॉनवेने ५२ चेंडूंत ११ चौकार व तीन षटकार मारले. विल यंगसोबत त्याने तिसऱ्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी करताच न्यूझीलंडने ३ बाद २१० धावा उभारल्या. विल यंगने ३० चेंडूंत ५३, मार्टिन गुप्तिलने २७ चेंडूंत ३५ आणि ग्लेन फिलिप्सने दहा चेंडूंत नाबाद २४ धावा कुटल्या.यानंतर लेग स्पिनर ईश सोढीने आठ चेंडूंत चार बळी घेत बांगलादेशला २० षटकांत ८ बाद १४४ असे रोखले. सोढीने सौम्या सरकार, मोहंमद मिथुन, कर्णधार महमदुल्लाह आणि मेहदी हसन यांना बाद केले. आरिफ हुसेनने ४५ आणि मोहम्मद शैफुद्दीन याने सातव्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी करीत पराभवाचे अंतर कमी केले. शैफुद्दीन ३४ धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलकन्यूझीलंड : २० षटकांत ३ बाद २१० धावा (कॉनवे नाबाद ९२, गुप्तिल ३५, विल यंग ५३ , फिलिप्स नाबाद २४) गोलंदाजी: नसुम अहमद २/३०, मेहदी हसन १/३७.बांगलादेश : २० षटकांत ८ बाद १४४ धावा (आरिफ हुसेन ४५, सैफुद्दीन नाबाद ३४, मोहम्मद नईम २७). गोलंदाजी : ईश सोढी ४/२८, लॉकी फर्ग्युसन २/२५.