भारतीय संघानं पहिल्या डे नाइट कसोटीत बांगलादेशवर डावानं विजय मिळवून विक्रमांचा पाऊस पाडला. सलग चार कसोटी सामने डावानं जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. पण, भारताच्या या विश्वविक्रमाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचीही साथ मिळाली अन् या तीनही संघांनी अनोखा विश्वविक्रम नावावर केला.
रविवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आणखी एक विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. बांगलादेशच्या पहिल्या डावाच्या 106 धावांच्या उत्तरात भारतानं 9 बाद 347 धावा केल्या. विराट कोहलीनं गुलाबी कसोटीत शतक झळकावण्याच्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संपूर्ण संघ 195 धावांत तंबूत पाठवून भारतानं मालिका 2-0 अशी खिशात घातली. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 19 विकेट्स घेतल्या.
या सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं एका डावात कुटलेल्या 580 धावा पाकिस्तानला दोन्ही डावांत मिळूनही करता आल्या नाही. बाबर आझमचे शतक आणि मोहम्मद रिझवानच्या 95 धावांच्या खेळीनंतरही पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
डावानं विजय मिळवणाऱ्या या दोन संघांत न्यूझीलंडनं एन्ट्री घेतली. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव किवींनी 353 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं पहिल्या डावात 9 बाद 615 धावा चोपल्या. बी जे वॉटलिंग आणि मिचेल सँटनर यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. वॉटलिंगनं 473 चेंडूंत 24 चौकार व 1 षटकार खेचून 205 धावा केल्या, तर सँटनरनं 269 चेंडूंत 11 चौकार व 5 षटकारांसह 126 धावा चोपल्या. डावानं पराभव टाळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या किवींकडून वॅगनरने इंग्लंडचा निम्मा संघ 44 धावांत माघारी पाठवला. सँटनरनेही 3 विकेट्स घेत विजयात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव 197 धावांत आटोपला आणि न्यूझीलंडनं एक डाव व 65 धावांनी विजय मिळवला.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी मिळून सलग सहा कसोटी सामन्यांत डावानं विजय मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले. यापैकी चार विजय हे भारतानं, तर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एक विजय मिळवले आहेत.
सहा सामन्यांचे निकाल
- भारत वि. विरुद्ध दक्षिण आफ्रिकाः एक डाव व 137 धावा
- भारत वि. विरुद्ध दक्षिण आफ्रिकाः एक डाव व 202 धावा
- भारत वि. विरुद्ध बांगलादेशः एक डाव व 130 धावा
- ऑस्ट्रेलिया वि. विरुद्ध पाकिस्तानः एक डाव व 5 धावा
- भारत वि. विरुद्ध बांगलादेशः एक डाव व 46 धावा
- न्यूझीलंड वि. विरुद्ध इंग्लंडः एक डाव व 65 धावा