Team India in Latest ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी वार्षिक क्रमवारी जाहीर केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाच्या खात्यात २७० रेटींग गुण आहेत, तर इंग्लंड ( २६५ ) व पाकिस्तान ( २६१) हे मागे आहेत. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी बाजूला ठेऊन त्यानंतर झालेल्या १२ ट्वेंटी-२० सामन्यांत विजय मिळवले आहेत.
विराट कोहलीने ट्वेंटी-२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे ही जबाबदारी आली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्यावर विजय मिळवले. या मालिकेत भारताने एकही सामना गमावला नाही. ट्वेंटी-२० क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेने २५३ रेटींग गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ २५१ रेटींग गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड ( २५०), वेस्ट इंडिज ( २४०), बांगलादेश ( २३३) व श्रीलंका ( २३०) यांचा क्रमांक त्यापाठोपाठ येतो. अफगाणिस्तानची दोन स्थानांनी घसरण झाली आहे आणि ते १०व्या क्रमांकावर गेले आहेत.