लंडन : लॉकडाऊननंतर ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी पहिला वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजीतही हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांचा अपवाद वगळता कर्णधार विराट कोहलीसह अन्य फलंदाज अपयशी ठरले. या सुमार कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया सर्व मालिकांमध्ये पराभूत होईल, असा दावा केला.
भारतीय खेळाडूंच्या देहबोलीवरही वॉनने सडकून टीका केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना सुरुवात आश्वासक झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी सलामीला ५३ धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने बाद झाले. भरवशाच्या लोकेश राहुलनेही निराशा केली. शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी मात्र पाचव्या गड्यासाठी १२८ धावांची भागीदारी केली. वॉनने विराटच्या नेतृत्वावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यासाठी विराटने आपल्या खेळाडूंना वारंवार सूचना द्यायला हवी होती. त्यादृष्टीने डावपेचही आखायला हवे होते. विराट स्वत:च्या कामगिरीसह संघात एकसूत्रता राखण्यात अपयशी ठरल्याचे वॉनचे मत आहे.