Join us  

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळणार नाही दिवस-रात्र कसोटी

भारत यंदा वर्षाअखेर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट आॅस्ट्रेलियाला (सीए) अधिकृतपणे कळविले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:20 AM

Open in App

नवी दिल्ली : भारत यंदा वर्षाअखेर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट आॅस्ट्रेलियाला (सीए) अधिकृतपणे कळविले आहे.क्रिकेट आॅस्ट्रेलिया कृत्रिम प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने कसोटी सामना आयोजित करण्यासाठी उत्सुक होता. कारण गेल्या काही वर्षांत येथे दौरा करणारे संघ दिवस-रात्र कसोटी सामना खेळत आहेत, पण बीसीसीआयने मात्र लाल चेंडूच्या परंपरागत कसोटी क्रिकेटवर कायम राहण्याचा निर्णय घेतला.भारतीय संघ व्यवस्थापनाने प्रशासकांच्या समितीला, दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या तयारीसाठी किमान १८ महिन्यांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी सीएचे मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांना ही सूचना देण्यास सांगितले. अ‍ॅडिलेडमध्ये ६ ते १० डिसेंबर दरम्यान खेळला जाणारा पहिला कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला जावा, यासाठी ‘सीए’ प्रयत्नशील होते.चौधरी यांनी पाठविलेल्या ई-मेलमध्ये लिहिले की, ‘प्रशासकांच्या समितीच्या सूचनेनुसार भारत या प्रकारची कसोटी जवळजवळ वर्षभरानंतर खेळू शकेल. त्यामुळे मला असे सांगताना खेद वाटतो की, प्रस्तावित दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाऊ शकत नाही. सर्व सामने परंपरागत पद्धतीने खेळले जातील.’-गेल्या आठवड्यात सदरलँडने आॅस्ट्रेलियातील एका रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत मालिका जिंकण्यास आतुर असल्यामुळे गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्यास इच्छुक नाही. आॅस्ट्रेलियाने मायदेशात अद्याप एक ही दिवस-रात्र कसोटी सामना गमाविलेला नाही.- भारतीय खेळाडूंमध्ये केवळ चेतेश्वर पुजारा व मुरली विजय यांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत गुलाबी चेंडूने दिवस-रात्र सामना खेळला आहे.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआॅस्ट्रेलिया