नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटूंना लवकरच घसघशीत वेतनवाढ मिळू शकते. आगामी मोसमात संघातील टॉप प्लेयर्स आणि रणजी क्रिकेटपटूंचे वेतन दुप्पट होऊ शकते. सध्या क्रिकेटपटूंसाठी 180 कोटींचा कॉर्पस निधी असून त्यामध्ये आणखी 200 कोटी रुपयांची वाढ करायची आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली क्रिकेट प्रशासकांची समिती फॉर्म्युला तयार करत आहे. जेणेकरुन पुढच्या मोसमापासून क्रिकेटपटूंना दुप्पट वेतन मिळू शकते.
सिनिअर आणि ज्यूनियर प्लेयर्सच्या मानधनाचे प्रमाण ठरवण्याच्या फॉर्म्युल्यावर काम सुरु आहे असे टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. फॉर्म्युल्यानुसार तयार केलेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी बीसीसीआयच्या पदाधिका-यांसमोर ठेवला जाईल. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या वेतनवाढीची मागणी करताना आपली बाजू ठोसपणे मांडली होती. सध्या जी व्यवस्था आहे त्यामध्ये बीसीसीआयच्या 26 टक्के वार्षिक महसूलाची तीन भागांमध्ये विभागणी केली जाते. 13 टक्के वाटा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना, 10.6 टक्के रणजी प्लेअर्सना आणि उर्वरित वाटा महिला आणि ज्यूनियर क्रिकेटपटूंना मिळतो. 2017 या वर्षात विराट कोहलीला 46 सामन्यांसाठी 5.51 कोटी रुपये मिळाले नव्या बदलानंतर विराटला वर्षाला 10 कोटी रुपये मिळतील. आयपीएल आणि जाहीरातींमधून कोहलीला यापेक्षा जास्त उत्पन्न मिळते.
रणजी क्रिकेटपटूंना सध्या वर्षाला 12 ते 15 लाख रुपये मिळतात. नवा फॉर्म्युला अंमलात आल्यानंतर याच रणजी क्रिकेटपटूंना वर्षाला 30 लाख रुपये मिळतील. राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूंना 100 टक्के वाढ मिळणार असेल तर तितकीच वेतनवाढ रणजी क्रिकेटपटूंना मिळेल. बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क देण्याबाबत करार केला आहे.
माध्यमसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपर्ट मर्डोकच्या मालकीच्या स्टार इंडिया वाहिनीसोबत 2018 ते 2022 पर्यंतच्या काळात आयपीएल प्रसारणाच्या हक्काचा करार केला आहे. या करारामुळे बीसीसीआयला स्टार इंडियाकडून 2.5 अब्ज डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. क्रिकेटच्या विविध फॉर्मेटमधील कामगिरीच्या आधारे भारतीय संघातील खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात येते. या श्रेणीनुसार खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात येतो. अ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन, ब श्रेणीतील खेळाडूंना त्या खालोखाल तर क श्रेणीतील खेळाडुंना कमी मानधन देण्याची तरतूद आहे. यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये भारतीय क्रिकेटपटूंना वार्षिक पगार म्हणून मिळणारी रक्कम ही जगातील इतर क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या रकमेपेक्षा कमी आहे, असं सांगत विराटनं यात वाढ करण्याची मागणी केली होती. तर, खेळाडूंना बोनसही मिळायला हवा, अशी मागणी संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेनं केली होती.