श्रीलंका दौऱ्यावर गेलेला पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत पोहोचली आहे. त्याचवेळी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या विराट कोहली अँड टीमला मोठा धक्का बसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि ही मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण, या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill) याला दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे तो कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( team India wants Prithvi Shaw as an opener for the England Test series)
अरे बापरे; सामना सुरू असताना वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू मैदानावर कोसळले, स्ट्रेचरवरून नेलं थेट हॉस्पिटलमध्ये!
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये क्षेत्ररक्षण करताना शुबमनला ही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून सावरण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागेल. अशात विराट अँड कंपनी सलामीला पर्याय म्हणून पृथ्वी शॉ याला श्रीलंका दौऱ्यावरून इंग्लंडला बोलवण्याची शक्यता बळावली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड दौऱ्यावर असलेली भारतीय टीम बीसीसीआयकडे तशी विनंती करणार आहे.
संघात राखीव सलामीवीर म्हणून मयांक अग्रवाल आणि अभिमन्यू इश्वरन हे दोन खेळाडू आहेत. मयांकनं २०१८ ते २०१९ या कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. दुसरीकडे इश्वरनकडे ६४ प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव आहे. पण, इंग्लंडचा दौरा प्रदीर्घ चालणार असल्यानं पृथ्वी शॉला बोलावण्याचा विचार सुरू झाला आहे.
सूत्रांनी सांगितले की,''पृथ्वी भन्नाट फॉर्मात आहे आणि सध्या तो श्रीलंका दौऱ्यावर आहे. पण, त्याला इंग्लंडला जावं लागू शकतं. संघाकडे लोकेश राहुल हा पर्याय आहे, परंतु त्याला मधल्या फळीत रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात आहे. अभिमन्यू इश्वरनला या महत्त्वाच्या मालिकेत पदार्पणाची संधी देणं, थोडं कठीण आहे.''