Join us  

IND vs SA : ऋतुराज गायकवाड येताच बसचा दरवाजा बंद; फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

ind vs sa odi : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 5:16 PM

Open in App

Ruturaj Gaikwad funny video । नवी दिल्ली : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. भारताच्या आफ्रिका दौऱ्याची सुरूवात ट्वेंटी-२० मालिकेने झाली, जी १-१ अशा बरोबरीत संपली. आता टीम इंडिया लोकेश राहुलच्या नेतृत्वात वन डे मालिका खेळत आहे. खरं तर ऋतुराज गायकवाड एकमेव खेळाडू आहे ज्याला आफ्रिकेविरूद्धच्या तिन्ही मालिकांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र, अद्याप त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. अशातच ऋतुराजचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यावरून नेटकरी त्याची फिरकी घेत आहेत. 

दरम्यान, पहिल्या वन डे सामन्यापूर्वीचा ऋतुराजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सलामीचा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला गेला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, ऋतुराज बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना अचानक बस चालक दरवाजा बंद करतो अन् हे पाहून ऋतुराजही चकित होतो. हा व्हिडीओ व्हायरल करून चाहते मराठमोळ्या खेळाडूला फ्लॉप शोवरून डिवचत आहेत. 

भारताची विजयी सलामी पहिला सामना जिंकून पाहुण्या भारतीय संघाने विजयी सलामी दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने लाजिरवाणी कामगिरी केली. आफ्रिकन संघ २७.३ षटकांत केवळ ११६ धावांत आटोपला. ११७ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सहज विजय मिळवला. टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करून पहिलाच सामना अविस्मरणीय केला. भारताने १६.४ षटकांत २ बाद ११७ धावा करून विजयाचे खाते उघडले. 

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर. 

वन डे मालिकेचे वेळापत्रक - १७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघऋतुराज गायकवाड