नवी दिल्ली : प्रशासकीय समितीने (सीओए) टीम इंडियाच्या खेळाडूंना पगारवाढ देण्यास मंजूरी दिली आहे. गुरूवारी नवी दिल्लीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिग धोनीसह झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे भारतीय क्रिकेटपटूंचं मानधन वाढवण्याची मागणी केली होती.
पुढील वर्षी टीम इंडिया इंग्लंडच्या दौ-यावर जाणार आहे, तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पहिल्या सामन्याच्या दोन आठवडे आधीच इंग्लंडला जाण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, नेमकी किती पगारवाढ होणार याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही.
क्रिकेटच्या विविध फॉर्मॅटमधील कामगिरीच्या आधारे भारतीय संघातील खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात येते. या श्रेणीनुसार खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात येतो. अ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन, ब श्रेणीतील खेळाडूंना त्या खालोखाल तर क श्रेणीतील खेळाडुंना कमी मानधन देण्याची तरतूद आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातील अव्वल खेळांडूची वर्षाची कमाई 20 कोटी इतकी आहे.
यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये भारतीय क्रिकेटपटूंना वार्षिक पगार म्हणून मिळणारी रक्कम ही जगातील इतर क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या रकमेपेक्षा कमी आहे, असं सांगत विराटनं यात वाढ करण्याची मागणी केली होती. तर, खेळाडूंना बोनसही मिळायला हवा, अशी मागणी संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेनं केली होती.