कराची : ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशातील क्रिकेटमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढण्याच्या मार्गात नरमाईचे धोरण अवलंबले आहे. यामुळे खेळातील भ्रष्टाचार कमी होण्यापेक्षा वाढला. दुसरीकडे लाहोरमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय संघांचा आमच्याप्रति दृष्टिकोन बदलल्याने पाकिस्तान क्रिकेटचा पुरता बट्ट्याबोळ झाला,’ असे मत माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जहीर अब्बास यांनी व्यक्त केले आहे.क्रिकेटमधील फिक्सिंगला गुन्हेगारी कक्षात आणण्यासाठी नवा कायदा बनविण्याची विनंती पीसीबीने सरकारकडे केली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अब्बास यांनी खेळातील भ्रष्टाचार आणि २००९चा दहशतवादी हल्ला ही दोन्ही कारणे देशातील क्रिकेटला मारक ठरल्याचे सांगितले.ते पुढे म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळताना आम्ही फारच नरमाईचे धोरण अवलंबले आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेटची लोकप्रियता ओसरली शिवाय देशातील क्रीडा क्षेत्राची प्रगती खुंटली. श्रीलंका संघाच्या बसवर २००९ ला लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे अतोनात नुकसान झाले. दुसऱ्या देशाविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठीदेखील आम्हाला मायदेशाबाहेर जाण्यास भाग पडावे लागले आहे. दुसरीकडे भ्रष्टााचाराच्या प्रकरणांमुळे आमचे क्रिकेट कित्येक वर्षे मागे गेले, हे सत्य नाकारता येणार नाही.’फिक्सिंगला गुन्हेगारी कक्षेत आणण्यासाठी फार आधीच बोर्डाने प्रयत्न करायला हवे होते. असे झाले असते तर अलीकडे झालेले स्पॉट फिक्सिंग प्रकरण घडलेच नसते. यामुळे आम्ही अनेक खेळाडू गमावले शिवाय नव्या दमाच्या क्रिकेटपटूंमध्येदेखील चुकीचा संदेश गेला. अखेर पाकिस्तान क्रिकेटचे जे नुकसान झाले ते भरून काढायला वर्षानुवर्षे लागणार, असे मत अब्बास यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दहशतवादी हल्ला, भ्रष्टाचार यामुळे पाक क्रिकेटचे झाले वाटोळे - जहीर अब्बास
दहशतवादी हल्ला, भ्रष्टाचार यामुळे पाक क्रिकेटचे झाले वाटोळे - जहीर अब्बास
क्रिकेटमधील फिक्सिंगला गुन्हेगारी कक्षात आणण्यासाठी नवा कायदा बनविण्याची विनंती पीसीबीने सरकारकडे केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:50 AM