नवी दिल्ली - मागच्या आठवडयाभरापासून विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर सोमवारी इटलीच्या बोर्गो फिनोचितो हॉटेलमध्ये दोघे विवाहबद्ध झाले. विराट आणि अनुष्का इटलीमध्ये विवाहबद्ध होणार अशा बातम्या येत होत्या. पण त्याचे कधी आणि कुठे लग्न होणार याबद्दल कोणाकडेही ठोस माहिती नव्हती. दोघांनी संपूर्ण विवाह सोहळयाबद्दल प्रचंड गुप्तता बाळगली होती. लग्नानंतरच त्यांनी टि्वट करुन विवाहाची माहिती दिली. विराट आणि अनुष्काने इतकी गुप्तता का बाळगली ? त्यामागे काय कारणे होती जाणून घेऊ या.
- विराट आणि अनुष्का 11 डिसेंबरला इटलीच्या टस्कनीमधील बोर्गो फिनोचितो हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाले. या लग्नाला दोन्ही कुटुंब आणि ठराविक मित्र परिवार उपस्थित होता. त्यामुळे आलेल्या पाहुण्यासाठी जास्त व्यवस्था करण्याची आवश्यकता भासली नाही.
- विराट-अनुष्काचे सेलिब्रिटी स्टेटस लक्षात घेता हा हायप्रोफाईल विवाह होता. आता लग्न झाल्यानंतर दोघांना इतक्या मोठया प्रमाणात कवरेज दिले जातेय. तेच आधीच लग्नाबद्दल मीडियाला कळले असते तर प्रसारमाध्यमांना आवरताना नाकीनऊ येण्याची शक्यता होती. विराट-अनुष्का पोहोचण्याआधीच बोर्गो फिनोचितो हॉटेलबाहेर मीडियाची गर्दी झाली असती.
- विराट आणि अनुष्काने भारतात लग्न करायचा निर्णय घेतला असता तर कोणाला सांगायचे आणि कोणापासून लपवायचे हा प्रश्न होता. कारण सीक्रेट ठेवायचे म्हटले तरी कुठून ना कुठून मीडियाला खबर लागलीच असती. परदेशात लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना प्रसारमाध्यमांपासून सुटका करुन घेता आली.
- अनुष्का शर्मा आणि आदित्य चोपडाची चांगली मैत्री आहे. अनुष्का आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आदित्यबरोबर शेअर करते त्याचा सल्ला घेते. आदित्य चोपडानेच अनुष्काला देशाबाहेर लग्न करण्याचा सल्ला दिला. जेणेकरुन लग्न समारंभ प्रायव्हेट राहील. आदित्य चोपडा स्वत:हा प्रसारमाध्यमांपासून दूर राहतो. यापूर्वी विराट आणि अनुष्काच्या नात्यात मतभेद निर्माण झाले तेव्हा आदित्यनेच मध्यस्थी केली होती.
- सध्या भारत आणि श्रीलंकमध्ये एकदिवसीय मालिका सुरु आहे. या दरम्यान भारतात लग्न झाले असते तर संपूर्ण संघ रिसेप्शनला उपस्थित रहाण्याविषयी शंका होती तसचं आपल्यामुळे संघाचे वेळापत्रक किंवा खेळावर परिणाम होऊ नये अशी नेहमीच विराटची इच्छा असते.
लग्नाची गुप्तता ठेवण्यासाठी विराटने केला होता करार लग्न होण्याआधी माहिती बाहेर फुटणार नाही याची विराट आणि अनुष्काच्या कुटुंबाने पूर्ण काळजी घेतली होती. या विवाहाशी संबंधित असणा-या सर्वांशी फोटोग्राफर्स, कॅटरर्स, हॉटेल स्टाफ यांच्याबरोबर गुप्तता बाळगण्याचा एक करार करण्यात आला होता. त्यामुळेच शेवटपर्यंत या विवाहाशी संबंधित कुठलीही ठोस माहिती किंवा फोटो लीक झाला नाही. लग्नानंतर दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन माहिती दिली.