दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या तिघांनी भारताचा दबदबा राखताना अव्वल पाच अष्टपैलूंमध्ये स्थान मिळवले. यातही जडेजा आणि अश्विन यांनी अनुक्रमे पहिल्या दोन स्थानी कब्जा केला असून अक्षर पाचव्या स्थानी आहे. गोलंदाजांमध्येही अश्विनच अव्वल स्थानी विराजमान आहे.
सध्या सुरू असलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात दमदार कामगिरी करून आणखी सुधारणा करण्याची अश्विनकडे संधी आहे. अष्टपैलूंमध्ये जडेजा ४५५ गुणांसह अव्वल असून त्यानंतर अश्विन ३७० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन (३२०), इंग्लंडचा बेन स्टोक्स (३०७) आणि अक्षर (२९८) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
गोलंदाजांमध्ये अश्विनने ८७९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (८२५) दुसऱ्या स्थानी असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (७८५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने जडेजाला (७८२) चौथ्या स्थानी खेचत आगेकूच केली. अव्वल दहामध्ये अश्विन आणि जडेजा हे दोघेच भारतीय आहेत. फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा केन विलियम्सन अव्वल स्थानी आहे. कर्णधार रोहित शर्मा भारताचा अव्वल फलंदाज ठरला असून तो दहाव्या स्थानी आहे. त्यानंतर ऋषभ पंत (१२) आणि विराट कोहली (१३) यांचा क्रमांक आहे.