Umran Malik Team India, IPL 2022: जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी 'टीम इंडिया'मध्ये स्थान मिळाले. IPL 2022 मध्ये त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे अवघ्या २२ वर्षांचा असूनही त्याला 'टीम इंडिया'मध्ये प्रवेश मिळाला. या आनंदाच्या वेळी उमरानने माजी भारतीय क्रिकेटर आणि आपला गुरू इरफान पठाणसोबत सेलिब्रेशन केले. इरफान पठाणने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात उमरान मलिकची 'टीम इंडिया'ती एन्ट्री त्यांनी केक कापून सेलिब्रेट केली. यावेळी सनरायझर्स हैदराबादचा अब्दुल समदही त्याच्यासोबत आहे. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इरफान पठाणने जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये दीर्घकाळ काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उमरान मलिक, अब्दुल समद यांसारखे युवा खेळाडू प्रशिक्षण घेत होते. त्यामुळेच दोघांनी आपला गुरू इरफान पठाणसोबत एकत्र सेलिब्रेशन केले. व्हिडिओ शेअर करताना इरफान पठाणने लिहिले की, उमरान मलिकचे खूप खूप अभिनंदन. आशा आहे की तुझे पदार्पण जम्मू-काश्मीरच्या मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच, अब्दुल समदलाही लवकरच संधी मिळेल असंही पठाणने लिहिले.
उमरान मलिकला सनरायझर्स हैदराबादने मेगा लिलावापूर्वी ४ कोटी रुपये देत संघात कायम ठेवले होते. या सीझनमध्ये उमरान मलिकने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले. उमरानचा सरासरी ताशी १४५ किमी वेगाने गोलंदाजी केली. तसेच, त्याने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ताशी १५७ किमी वेगाने टाकला. उमरान मलिकने १४ सामन्यांत एकूण २२ विकेट घेतल्या आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो टॉप ५ मध्ये सामील झाला.