कोलकाता - विदर्भाच्या क्रिकेट संघाने इतिहास रचला असून प्रथमच रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या सामन्यात कर्नाटकावर पाच धावांनी विजय मिळवून विदर्भाचा संघ रणजीच्या अंतिम फेरीत दाखल झाला. विदर्भाने कर्नाटकाला विजयासाठी 198 धावांचे लक्ष्य दिले होते. विदर्भाच्या भेदक मा-यासमोर कर्नाटकाचा डाव 193 धावांवर संपुष्टात आला.
वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी विदर्भाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गुरुवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी त्याने तीनही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत विदर्भाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुस-या डावात गुरबानीने एकूण सात विकेट घेतल्या. आज गुरबानीने कर्णधार विनय कुमार (36), मिथुन (33) आणि एस अरविंद (2) यांच्या विकेट काढल्या. काल चौथ्या दिवशी सात बाद 111 अशी कर्नाटकाची स्थिती होती.
गणेश सतीश(८१) आणि आदित्य सरवटे(५५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर दुसऱ्या डावात विदर्भाने ३१३ पर्यंत मजल गाठली. उमेश यादव आणि गुरबानी यांचा वेगवान मारा खेळणे प्रतिस्पर्धी फलंदाजांना कठीण जात होते. दुस-या डावात कर्नाटकची सुरुवात खराब झाली. या सत्रात हजारावर धावा काढणारा मयंक अग्रवालला उमेशने आपल्याच चेंडूवर झेलबाद केले. आर.समर्थ(२४) व देगा निश्चल(७) यांनी जवळपास १६ षटके खेळली पण धावांसाठी त्यांना झुंजावे लागले. युवा वेगवान गोलंदाज सिद्धेश नेरळ याने दोघांनाही लागोपाठ बाद करताच तीन बाद ३० अशी अवस्था होती.
पहिल्या डावात चांगली खेळी करणारा करुण नायर(३०)आणि सी.एस. गौतम(२४)यांनी जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न केला पण २४ वर्षांच्या गुरबानीने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. त्याने नायरला यष्टीमागे झेल देण्यास बाध्य केले तर स्टुअर्ट बिन्नीला भोपळाही न फोडू देताच परत पाठविले. सीएम गौतम आणि कृष्णप्पा गौतम यांना लागोपाठच्या षटकांत बाद करीत रजनीशने ३५ धावांत चार गडी बाद केले.
त्याआधी, विदर्भाने दुसऱ्या डावाची सुरुवात ४ बाद १९५ वरून केली. सतीश आणि अक्षय वाडकर(२८) यांनी पाचव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. मात्र मधली फळी कोसळताच विदर्भाने २४५ धावांत आठ गडी गमावले होते. सरवटेने एक टोक सांभाळून उमेश यादवसोबत(१२) नवव्या गड्यासाठी ३८ तसेच गुरबानी (नाबाद ७)याच्यासोबत अखेरच्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी केली. कर्नाटककडून विनयकुमार आणि बिन्नी यांनी प्रत्येकी तीन तसेच एस. अरविंदने दोन गडी बाद केले.