भारताच्या हर्लीन देओलनं शुक्रवारी इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफलातून झेल घेतला. क्षेत्ररक्षणात चपळता अन् समय सूचकतेचं उदाहरण हर्लीन देओलनं दाखवून देताना इंग्लंडच्या अॅमी जोन्सला तंबूत जाण्यास भाग पाडले. सोशल मीडियावर सध्या हर्लीननं घेतलेल्या कॅचचीच चर्चा सुरू आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनीही हर्लीनचं कौतुक केलं. भारतीय महिला खेळाडूनं त्यांचे आभार मानले.
शिखा पांडेच्या गोलंदाजीरवर भारतासाठी डोईजड झालेल्या अॅनी जोन्सनं सुरेख फटका मारला, पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या हर्लीननं तो चेंडू टिपला. तोल सीमारेषेबाहेर जात असल्याचे समजताच तिनं चेंडू पुन्हा हवेत फेकला अन् सीमारेषेबाहेरून हवेत झेप घेत पुन्हा तो झेलला. तिच्या या कॅचचं अनेकांनी कौतुक केलंच, शिवाय प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या खेळाडूंनी टाळ्या बाजवल्या. जोन्स २६ चेंडूंत ४३ धावांवर माघारी परतली.
इंग्लंडच्या महिला संघानं २० षटकांत ७ बाद १७७ धावा केल्या. नॅट शिव्हर ( ५५), जोन्स ( ४३) व डॅनी वॅट ( ३१) यांनी संघाच्या धावसंख्येत हातभार लावला. भारताकडून शिखा पांडेनं २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतानं ८.४ षटकांत ३ बाद ५४ धावा केल्या होत्या आणि पावसामुळे खेळ रद्द करावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला १८ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.