बुलावायो - पुढच्या वर्षी होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभात, अर्थात विश्वचषक स्पर्धेत खेळण्याच्या इराद्यानं झपाटलेल्या झिम्बाब्वेनं नेपाळचा ११६ धावांनी धुव्वा उडवला. या विजयाचा शिल्पकार ठरला, तो शतकवीर सिकंदर रझा. त्याच्या झंझावाती खेळीनं क्रिकेटप्रेमींना खुश करून टाकलंच, पण एका फटक्यानं सगळ्यांनाच 'याड' लावलं.
झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३८० धावांचा डोंगर उभा केला होता. सिकंदर रझानं ६६ चेंडूत १२३ धावांचा पाऊस पाडला. झिम्बाब्वेच्या ४ बाद २०० धावा झाल्या असताना तो मैदानावर आला आणि त्यानंतरच्या वादळात नेपाळचा पार पालापाचोळा होऊन गेला. सिकंदर आणि ब्रँडन टेलर यांनी नेपाळच्या गोलंदाजांची धुलाई केली. टेलरनं ९१ चेंडूत शतक झळकावलं, तर रझानं ७ चौकार आणि ९ षटकारांची आतषबाजी केली. त्यातला एक षटकार पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
रझानं आपलं शतक षटकार ठोकूनच पूर्ण केलं. हा षटकार स्टेडियमच्या बाहेर जाऊन एका कारच्या काचेवर आदळला. आयसीसीनं या जबरदस्त फटक्याचा व्हिडिओच ट्विट केला आहे. बघा, तुम्हीही अवाक व्हाल...