ठळक मुद्दे क्रिकेट जगतामध्ये त्यांना जय-वीरू या नावाने ओळखले जायचे.
मुंबई : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी एकेकाळी क्रिकेट विश्वाला वेड लावले होते. क्रिकेट जगतामध्ये त्यांना जय-वीरू या नावाने ओळखले जायचे. शालेय क्रिकेटमध्ये त्यांनी रचलेली 664 धावांची भागीदारी अजूनही क्रिकेट चाहत्यांना विसरता आलेली नाही. पण गेल्या काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याचे म्हटले जात होते. पण आता सचिनच्या अकादमीमध्ये कांबळी क्रिकेटचे धडे देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका वृत्तपत्राने याबाबतची बातमी प्रसारीत केली आहे.
सचिनने इंग्लंडमधली मिडलसेक्स या क्लबच्या माध्यमातून आपली अकादमी सुरु केली आहे. ' तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अकादमी' या नावाने सचिन युवा पिढीला प्रशिक्षण देणार आहे. या अकादमीने नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम, मुबंईतील एमआयजी क्लब येथे शिबीर घेण्याचे ठरवले आहे. या शिबिरामध्ये कांबळीही प्रशिक्षण देणार आहे.
" विनोद आणि मी एकत्रितपणे बरेच सामने खेळलो आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही एकत्र आलो, तेव्हा मी त्याला या अकादमीबद्दल सांगितले. या अकादमीमध्ये योगदान देण्यासाठी विनोद तयार झाला. त्याच्यासारखा खेळाडू अकादमीमध्ये असणे ही आनंददायी बाब आहे."
सचिन आणि विनोद ही जोडी 1990च्या दशकात चांगलीच गाजली होती. पण त्यानंतर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. सचिनने आपल्या निवृत्तीनंतर दिलेल्या पार्टीला विनोदला बोलावले नव्हते. त्यावेळी त्यांच्यामध्ये वितुष्ट आल्याचे बऱ्याच जणांना समजले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा सचिन आणि विनोद यांच्यामध्ये संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. आता तर सचिनने आपल्या अकादमीमध्ये विनोदला प्रशिक्षकाची संधी देऊन मैत्रीचा हात पुढे केला असल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत कांबळी म्हणाला की, " माझ्यासाठी हे सारे स्वप्नवत असेच आहे. सचिनने जेव्हा मला याबद्दल विचारलं तेव्हा मी त्याला तात्काळ होकार दिला. पुन्हा एकदा मैदानांशी जोडण्यासाठी माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. सचिनने जो आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. "
Web Title: Vinod Kambli will be coaching in sachin tendulkar's academy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.