मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद आज स्वीकारले. गांगुली अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील विनोद राय आणि डायना एडल्जी आपले पद सोडणार आहेत. पण बीसीसीआयमधून बाहेर पडताना हे दोघेही करोडपती झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमधील कारभार स्वच्छ करण्यासाठी प्रशासकीय समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये राय, एडल्जी यांच्यासह विक्रम लिमये, रामचंद्र गुहा आणि रवि थोडगे यांचा समावेश होता.
बीसीसीआयची प्रशासकीय समिती ही जवळपास 30 महिने कार्यरत होती. पण काही महिन्यांपूर्वी विक्रम लिमये, रामचंद्र गुहा आणि रवि थोडगे यांनी प्रशासकीय समितीला रामराम ठोकला होता. त्यानंतर राय आणि एडल्जी यांनीच ही समिती सांभाळली होती. या दोघांना 2017 साली 10 लाख, 2018 साली 11 लाख आणि 2019 साली 12 लाख रुपये प्रति महिने मानधन होते. त्यानुसार या दोघांना आतापर्यंत जवळपास साडे तीन कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळाले आहेत.