नवी दिल्ली : भारताचा फलंदाज सुरेश रैनाचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. एका व्हिडीओमध्ये रैनाचे अपघाती निधन झाल्याचे दिसत आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच वायरलही झाला आहे. या वृत्तामुळे बऱ्याच जणांना धक्का बसला आणि त्यांनी यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.
रैना क्रिकेट जगतामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. रैनाच्या नावावर 226 एकदिवसीय सामने आहेत. या 226 सामन्यांमध्ये त्याने 35.31च्या सरासरीने 5615 धावा केल्या आहेत. रैनाने 78 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या 78 सामन्यांमध्ये 134.87च्या स्ट्राइक रेटने 1605 धावा केल्या आहेत. रैना 18 कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून खेळला होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला जास्त यश मिळाले नाही.
यूट्यूबवर काही जणांनी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रैनाचा अपघात झाल्याचे दिसत आहे. अपघातामध्ये मृत पावलेली व्यक्ती ही रैनासारखी दिसत असली तरी ती रैना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या निधनाची वार्ता कळल्यावर रैना चांगलाच भडकला असून त्याने यूट्यूब चॅनेलच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. रैनाने ट्विटरच्या माध्यमातून ही अफवा दूर केली आहे.
रैनाने ट्विटरवर लिहीले आहे की, " माझ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये माझे निधन झाल्याची अफवा पसरली आहे. या अफवांमुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार मी दाखल करणार आहे. या अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई व्हायला हवी. माझी सर्वांना विनंती आहे की, या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी एकदम फिट आहे."
गेले काही दिवस रैना हा भारतीय संघाबरोबर नाही. त्यामुळे बराच काळ त्याला लोकांनी पाहिलेले नाही. त्यामुळे त्याच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती दिसली आणि लोकांना तो रैना असल्याचे वाटले. त्यामुळे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा रैनाचे निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. पण आता दस्तुरखुद्द रैनानेच या गोष्टीवर खुलासा केला आहे