लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना बुधवारी विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान हा सलग दुसऱ्या वर्षी ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बीयूमोंट, जोस बटलर, सॅम कुरन आणि रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे.
महिला क्रिकेटपटूंत मानधनाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तिने 2018 मध्ये वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 669 व 662 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला सुपर लीग ट्वेंटी-20त तीने 174.68 च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या आहेत आणि त्यात एका शतकाचाही समावेश आहे.