मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. क्रिकेटमधला असा कोणता विक्रम नाही, जो कोहलीने नावावर केला नसेल. त्यामुळेच ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे आणि त्यात त्यांनी कोहलीला देशातील सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची विनंती केली आहे.
मागील काही वर्षांत कोहलीने दमदार फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने सर्वात जलद दहा हजार धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम केला. त्याने एकहाती फटकेबाजी करताना पहिल्या तीन सामन्यांत सलग तीन शतकं झळकावली. असे अनेक विक्रम त्याने केले व मोडलेही.
5 नोव्हेंबरला कोहलीने 30 वा वाढदिवस साजरा केला आणि त्याच निमित्ताने कोहलीला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे.''आपला देश क्रिकेट वेडा म्हणून ओळखला जातो.. इथे हा खेळ एखाद्या सणासारखा साजरा होतो. मागील काही वर्षांपासून कोहली क्रिकेट चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे. क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी त्याला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,'' या आशयाचे पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे.
कोहलीने 73 कसोटी आणि 216 वन डे सामन्यांत अनुक्रमे 6331 आणि 10232 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर वन डेत 38 आणि कसोटीत 24 शतकांचा सामवेश आहे. सर्वात जलद 60 आंतरराष्ट्रीय शतकं करण्याचा विक्रमही कोहलीने नावावर केला आहे.