ठळक मुद्दे महेंद्रसिंग धोनीची स्तुती तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी केली होती. त्यांना पाकिस्तानने आपल्या देशांतून बाहेर काढायला हवे होते का?
आपण कसे काम करतो, यापेक्षा आपण कसे वागतो, हे सर्वात महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळेच तुमची छबी तयार होत असते. तुम्ही कितीही चांगलं काम करा, पण जर तुमचा व्यवहार, वाणी चांगली नसेल तर लोक तुमचा सन्मान करत नाहीत. याचं सर्वात चांगलं आणि नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजे विराट कोहली. कोहली फलंदाज म्हणून चांगलाच आहे. त्याचे चाहतेही बरेच आहेत. अनेकांच्या गळ्यातील तो ताईत आहे. पण फक्त एक विधान केल्यावर भारतीय चाहते त्याच्यावर तुटून पडले आणि त्याचा लोकांच्या मनातील प्रतिमेला थोडा तडा गेला.
क्रिकेट हा खेळ आहे. तो मनोरंजनासाठी आहे. क्रिकेटमध्ये खेळभावनेला सर्वात जास्त महत्त्व आहे. एखाद्या खेळाडूने जर चांगली कामगिरी केली तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही त्याचे कौतुक करतात. ही गोष्ट व्हायलाच हवी. त्यामुळे जय-पराजय बाजूला सारत सामना संपल्यावर प्रत्येक खेळाडू हात मिळवतात. हे चांगल्या खेळभावनेचं लक्षण आहे. त्यामुळे भारतातल्या एका चाहत्याला जर अन्य देशांतील खेळाडू आवडत असेल तर त्यामध्ये गैर काहीच नाही.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि दस्तुरखुद्द कोहलीचे चाहते भारताबाहेरही आहेत. तसेच अन्य खेळाडूंच्या बाबतीतही भारतात होऊ शकते. एबी डी 'व्हिलियर्स जेव्हा भारतातील मैदानात यायचा तेव्हा चाहते 'एबी... एबी...' असा गजर करायचे. सचिन जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर लॉर्ड्सवर एका सामन्यासाठी खेळायला उतरला होता, त्यावेळी पॅव्हेलियनमधून मैदानात येईपर्यंत चाहत्यांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली होती. त्यावेळी त्यांच्यावर इंग्लंडच्या सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा होता का ?, महेंद्रसिंग धोनीची स्तुती तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी केली होती. त्यांना पाकिस्तानने आपल्या देशांतून बाहेर काढायला हवे होते का?, क्रिकेटसारखा 22 यार्डांमधला हा खेळ दोन देशांना जोडायचे काम करतो, असे आपण बऱ्याचदा ऐकले आहे. हा खरा तर क्रिकेटचा विजय आहे. त्यामध्ये खेळ, खेळाडू, खेळभावना महत्त्वाची समजायला हवी. पण कोहली महाशयांना मात्र तसे काही वाटत नसावे. कोहलीला जर तसे वाटले असते तर त्याने चाहत्याला फटकारले नसते.
कोहलीची तुलना काही वेळेला सचिनशी केली जाते. सचिन खेळत असताना त्याच्या कारकिर्दीत बरेच चढ-उतार आले. पण त्याने कधीही चाहत्यांना असे फटकारले नाही. त्यामुळेच दुसरा सचिन होऊ शकत नाही, असेही म्हटले जाते. कोहली हा फलंदाज म्हणून मोठा असेलही, पण त्याने माणूस म्हणूनही उंची वाढवायला हवी. सध्याच्या घडीला कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टॉपवर आहे. धावांचे इमले तो उभारतोय, विक्रम रचतोय, हे सारे करत असताना त्याने या गोष्टींवर भाष्य करणे कितपत योग्य आहे, याचे उत्तर मिळत नाही. सचिन नेहमीच आपल्या टीकाकारांना बॅटनेच उत्तर देत आला. कोहलीनेही एकदा शतक झळकावता सचिनची कॉपी केली होती. शतक झळकावल्यावर माझी बॅटच बोलते, असे हातवारे त्याने करून दाखवले होते. पण जर तुझी बॅट बोलत असेल, तर या गोष्टींवर भाष्य करण्याची गरज आहे का?, हा कोहलीसाठी मोठा सवाल असेल. जेव्हा तुम्ही एखाद्या उंचीवर पोहोचता, तेव्हा आपल्यावर टीका होणार हे तुम्ही गृहीतच धरायचे असते. पण त्या टीकेला आपण उत्तर कसे द्यायचे, हे तुम्ही ठरवायचे असते. हे जेव्हा तुम्हाला अचूक कळते तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने परिपक्व होत असता. एखादा चाहता तुमच्याबद्दल काही बोलला तर तुम्ही लहान होऊ शकता का? या गोष्टीचा विचार कोहलीने करायला हवा. शब्दांनी जशी माणसे जोडली जातात तशी ती तुटतातही, हेदेखील तुम्हाला माहिती असायला हवे. चाहत्याचे मत महत्त्वाचे की तुमची कामगिरी, हे तुम्ही ठरवायचे असते.
आजचेही एक उदाहरण तुम्ही घेऊ शकता. आज हैदराबादमध्ये बीसीसीआय आणि खेळाडू यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कोहली आणि रोहित शर्मा हे उपस्थित होते. आगामी विश्वचषकात संघाची चांगली कामगिरी कशी करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कोहली म्हणाला की, काही महत्त्वाच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवता कामा नये. हे त्याने जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार यांना उद्देशून म्हटले होते. पण कोहलीदेखील महत्त्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळणार नाही का? त्या बैठकीमध्ये,' जर मला विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल, तर मी आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे कोहली का म्हणाला नाही, याचे उत्तर मिळत नाही. कोहलीकडून भारताला फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्याने धावांचे इमले रचावेत, चांगले नेतृत्व करावे ही चाहत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण किती परिपक्व आहोत किंवा नाही, हे कोहलीने मैदानात दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे कोहलीने शब्द जरा जपून वापरावे, अशीच चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.
Web Title: Virat kohli, just look at it ... do not behave like this!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.