पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने 5-1 ने मालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे. पाचव्या सामन्यात रोहित शर्मा आणि कुलदीप यादव यांच्याव्यतिरिक्त अजून एका भारतीय खेळाडूने आपल्या जबरदस्त खेळीने सामन्याचं चित्र पालटलं. हा खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. फलंदाजीत हार्दिक पांड्या सपशेल फेल ठरला असला तरी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मात्र त्याने जबरदस्त कामगिरी केली. एबी डेव्हिलिअर्स आणि जे पी ड्यूमिनी यांची विकेट पांड्याने घेतली, सोबतच हाशिम आमलाला रन आऊट करत संघाला महत्वाची विकेट मिळवून दिली.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक याने विराट कोहलीला हार्दिक पांड्यामध्ये आपली छबी दिसत असल्याचं म्हटलं आहे. सोबतच हार्दिक पांड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून जास्त काळ संघात स्थान मिळेल अशी भविष्यवाणीही शॉन पोलॉकने केली आहे.
'विराट कोहलीला हार्दिक पांड्याचा स्वभाव आवडतो. कोहली ज्याप्रकारे क्रिकेट खेळतो त्याचप्रमाणे आक्रमकपणे हार्दिक पांड्या खेळतो. त्यांच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला संघाता स्थान पक्कं करण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ मिळेल', असं शॉन पोलॉकने म्हटलं आहे.
यावेळी बोलताना शॉन पोलॉकने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडमध्ये ते भारतीय विजयात आपली भूमिका बजावू शकतील का? असा प्रश्न पोलॉकनं केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुासर, पोलॉक असे म्हणाला की, इंग्लंडमधील खेळपट्या या वेगळ्या आहेत. तिथे चेंडूला स्विगं मिळेलच असे नाही. विश्वचषकापूर्वी तुम्ही इंग्लंड दौऱ्यावर जात आहात त्यामध्ये तूम्हाला त्याचे अकलान करता येईल. इंग्लंडच्या खेळपट्या या वेगवान गोलंदाजांना साथ देतात, फिरकी गोलंदाजांना तिथे हवा तसा स्विंग मिळत नाही. त्यामुळं भारतीय संघानं इंग्लंड दौऱ्यानंतर चहल-कुलदिपच्या कामगिरीचे आकलन करावे.